नवी मुंबई : महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या परिपत्रकानुसार दि. २६ नोव्हेंबर हा ’संविधान दिन’ म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिन निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
२६ ते २८ नोव्हेंबर २०१५ या कालावधीत वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सार्वजनिक प्रदर्शनी चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. या प्रदर्शनाचा शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य खा. राजन विचारे, बेलापूर विधानसभा सदस्य आ.सौ. मंदाताई म्हात्रे, ऐरोली विधानसभा सदस्य आ. संदीप नाईक, विधानपरिषद सदस्य आ. नरेंद्र पाटील आदी मान्यवर मुख्य अतिथी म्हणून तसेच उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेता जयवंत सुतार, विरोधी पक्ष नेता विजय चौगुले, परिवहन समिती सभापती साबू डॅनिअल हे प्रमुख अतिथी म्हणून तसेच सर्व पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
त्याचप्रमाणे दि. २८ नोव्हेंबर २०१५ रोजी संविधान दिन विशेष समारंभ विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे सकाळी ११ वा. आयोजित करण्यात येत असून याप्रसंगी नामांकीत अर्थतज्ज्ञ व साहित्यिक तथा नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातील दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाला भेट द्यावी तसेच डॉ. नरेंद्र जाधव यांच्यासारख्या प्रख्यात साहित्यिक, व्याख्यात्याच्या भारतीय संविधानावरील मार्गदर्शक विचारप्रवर्तक व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती सौ. मोनिका पाटील, उप सभापती सौ. सुरेखा नरबागे आणि समिती सदस्यांच्या वतीने करण्यात येत आहे.