मुंबई : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या २७ डिसेंबरला मतदान तर ३० ला मतमोजणी केली जाईल. दरम्यान, ९ डिसेंबरपासून नामांकन अर्ज भरण्यास सुरवात होईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणूक हालचालींना वेग येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवण्यात आलेले ८ सदस्य येत्या १ जानेवारी रोजी निवृत्त होणार आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून गेलेले शिवसेनेचे रामदास कदम व कॉंग्रेसचे भाई जगताप, सोलापूरमधील राष्ट्रवादीचे दिपक साळुंखे, कोल्हापूरमधील कॉंग्रेसचे महादेवराव महाडिक, धुळे-नंदूरबारमधून कॉंग्रेसचे अमरिश पटेल, अकोला-बुलढाणामधून शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया, अहमदनगरचे अपक्ष अरूण जगताप आणि नागपूरमधून कॉंग्रेसचे राजेंद्र मुळक यांचा समावेश आहे. केंद्रिय निवडणूक आयोगाने या आठ जागांसाठी निवडणुकांची घोषणा केली आहे.
या निवडणुकांसाठी ९ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येतील. १० डिसेंबरला छाननी होणार असून १२ डिसेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख असेल. २७ डिसेंबर रोजी तेथे मतदान होणार असून ३० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होतील. या निवडणुकीत आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही कॉंग्रेसने घेतला आहे. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक विधान परिषदेच्या २५ जागांसाठी तर तेलंगणा विधान परिषदेच्या १२ जागांसाठी २७ डिसेंबरलाच मतदान होईल.