कायम कामगार भरतीबाबत रविंद्र सावंतांची आग्रही मागणी
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात यापुढे कर्मचारी भरती करताना कंत्राटी कामगारांची भरती न करता कायम कामगारांची भरती करणेची लेखी मागणी कॉंग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून गुरूवारी (दि. २६ नोव्हेंबर) केली आहे.
कंत्राटी सेवेचे र्निमूलन करण्यात यावे असे न्यायालयाचे स्पष्टपणे निर्देश असतानाही नवी मुंबई महापालिका प्रशासनात कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून काम करवून घेतले जात आहे. नागरी सुविधा पुरविण्याचे तसेच नागरी समस्या सोडविण्याचे काम आणि रूग्णालयीन आरोग्य व्यवस्था सांभाळण्याचे अधिकांश काम कंत्राटी कामगारांच्या माध्यमातून करवून घेतले जात आहे. याच कंत्राटी कामगारांच्या परिश्रमामुळेच नवी मुंबई महापालिका प्रशासनाला राज्यात संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमाकांचा दोन वेळा पुरस्कार मिळालेला आहे. कंत्राटी कामगारांनी आपली सेवा कायम करण्यासाठी आजवर महापालिका मुख्यालय ते मंत्रालय अनेक वेळा आंदोलनेही केली आहेत. न्यायालयाचे व मंत्र्यांचे दरवाजेही ठोठावले आहेत. तथापि या कामगारांची सेवा आजतागायत कायम झालेली नसल्याचे सांगत रविंद्र सावंत यांनी निवेदनातून नाराजी व्यक्त केली आहे.
मध्यंतरी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगारांची सेवा कायम झाल्याचे फलक लावून, फटाके फोडून या कामगारांची भावनिक फसवणूकही करण्यात आली. पण आजही या कामगारांना कंत्राटी तत्वावरच ठेकेदारांच्या माध्यमातून काम करावे लागत आहे. कामगारांची सेवा कायमस्वरूपी आवश्यक असतानाही मनपा त्यांची सेवा कंत्राटी पध्दतीने का करवून घेत आहे, हे एक न समजण्यापलिकडचे कोडे आहे. ठेकेदारांचे चोचले पुरविण्यासाठी कंत्राटी संकल्पना राबविली जात असल्याचे स्पष्टपणे पहावयास मिळते. महापालिका प्रशासनाने यापुढे कामगार भरती करताना कंत्राटी तत्वावर न करता कायम तत्वावर करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.