नवी मुंबई : महापालिका सभागृहात १११ नगरसेवक असून सर्वसाधारण सभेदरम्यान महापालिका प्रशासनाकडून प्रश्नोत्तरांच्या तासाला अवघ्या अर्ध्या तासाचाच कालावधी दिला जातो. या कालावधीत नगरसेवकांच्या प्रश्न-उत्तरांना पुरेसा न्याय मिळत नसल्याने सर्वसाधारण सभेदरम्यान प्रश्नोत्तरांकरता वेळ वाढविण्याची लेखी मागणी सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे नगरसेवक नामदेव भगत यांनी महापालिका आयुक्त, महापौर, महापालिका सचिवांकडे एका निवेदनातून केली आहे.
या निवेदनातून महापालिका कामकाजादरम्यान चालणार्या अनेक चुकीच्या गोष्टींवर प्रकाशझोत टाकत नगरसेवक नामदेव भगत यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिका सभागृहात सर्वसाधारण सभेदरम्यान पिठासिन अधिकारी म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेचे कामकाज चालविण्यासंबंधीचे विनिमय महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, अनुसूचिच्या प्रकरण-२च्या नियम १मधील तरतुदीन्वये तयार केलेले विनियम १ (अ) प्रमाणे २० तारखेच्या सभा बोलविली पाहिजे. परंतु नुकतीच झालेली सभा आपण २० तारखेला बोलविलेली आहे. याचाच अर्थ ही बोलविण्यात आलेली सभा विनिमयाचे उल्लंघन करून घेण्यात आलेली आहे. शिवाय प्रशासनाकडून प्रत्येक सभेची तारीख पत्राद्वारे कळविण्यात येते. पण त्या तारखेस सभा न घेता सभेची दुसरी तारीखही निश्चित करणे नियमबाह्य असून याप्रकरणी पदाचा दुरूपयोग केला जात आहे. यापुढे असे न करण्याचे नगरसेवक नामदेव भगत यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रत्येक सभेचे इतिवृत्त पुढील सभेस देण्याचे बंधनकारक असतानाही सभेचे इतिवृत्त सचिवांमार्फत पाठविले जात नाही. या गोष्टी गांभीर्याने घेण्यात येत नाहीत. नगरसेवक पालिका आयुक्तांकडे उत्तरे जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारत असतात. पण या प्रश्नांची उत्तरे सचिवांमार्फत सभा सुरू होण्याअगोदर ५ ते १० मिनिटे अगोदरच दिली जातात. प्रश्नोत्तरांचा तास असे म्हटले जात असले तरी अवघ्या अर्ध्या तासात हा कार्यक्रम आटोपला जातो. सभागृहात नगरसेवक १११ असून या अर्ध्या तासात मोजक्याच नगरसेवकांना बोलता येते. प्रश्नोत्तरांकरता कालावधी कमी असल्याने सर्व नगरसेवकांना आपली भूमिका मांडणे शक्य होत नाही. त्यामुळे समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून प्रश्नोत्तरांकरता वेळ वाढविण्याची मागणी नगरसेवक नामदेव भगत यांनी केली आहे.