नवी मुंबई : अत्यंत विविधता असलेल्या आपल्या देशातील जनतेला एकमेकांशी जोडून ठेवणारा ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान असून आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानाची माहिती असणे गरजेचे असल्याचे सांगत नामांकीत अर्थतज्ज्ञ, साहित्यिक डॉ. नरेंद्र जाधव यांनी संविधान निर्मिती प्रकिया, संविधान उद्देशिकेचे महत्व, नागरिकांचे मुलभूत अधिकार याबाबत सविस्तर माहिती देत भारतीय संविधानाने आपल्याला अभिमानाने जगण्याचा अधिकार दिला आहे आणि संविधानामुळेच लोकशाहीने आपल्याकडे चांगले मूळ धरले आहे असे मत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृह येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यातिथीदिनानिमित्त आयोजित संविधान दिन विशेष समारंभप्रसंगी त्यांनी संविधानाचे महत्व व नागरिकांची जबाबदारी याविषयी उपस्थितांशी वैचारीक संवाद साधला.
याप्रसंगी डॉ. नरेंद्र जाधव यांचेसोबत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृहनेता जयवंत सुतार, कार्यक्रमाच्या निमंत्रक समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती मोनिका पाटील व उपसभापती सुरेखा नरबागे, पाणीपुरवठा व मलनि:स्सारण समिती सभापती अशोक गुरखे, विधी समिती सभापती भारती पाटील, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती प्रकाश मोरे, विद्यार्थी व युवक कल्याण समिती सभापती गिरीश म्हात्रे, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार व अंकुश चव्हाण उपस्थित होते.
आपले संविधान, आपला आत्मसन्मान ही भूमिका विषद करताना नागरिकांना संविधानामुळे प्राप्त झालेल्या अधिकारांबरोबरच आपल्या सम्यक कर्तव्याची जाणीव होणे गरजेचे आहे. याकरीता दहावीपर्यंत अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र हा विषय अनिवार्य करण्यात यावा व त्यामध्ये ५० टक्के भाग संविधानावर आधारीत असावा असे मत मांडत नरेंद्र जाधव यांनी संविधानाचे महत्व जनमानसात प्रसारीत होण्याकरीता नवी मुंबई महानगरपालिकेने हा विशेष कार्यक्रम आयोजित करून घेतलेल्या पुढाकाराबद्दल कौतुक केले. सुजाण नागरिक म्हणवून घेण्यासाठी भारतीय संविधानाची किमान माहिती प्रत्येकाला असायला हवी असे सांगत उद्देशिका अर्थात सरनामा हा भारतीय संविधानाचा आत्मा असून कमीत कमी शब्दात प्रभावी आशय मांडणारी उद्देशिका ही सर्वोत्तम प्रभावी रचना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्य, समता. बंधुत्व ही घटनेची मूलतत्वे बुध्द शिकवणूकीतून घेतली असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे अशी माहिती देत बाबासाहेबांनी घटनेचा मसूदा तयार करण्यासाठी व त्यातील विविध तरतुदींवर चर्चा घडवून आणून सर्वांची सहमती मिळविण्याचे अत्यंत कठीण काम केले असल्याने देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनीही बाबासाहेबांसारखी व्यक्ती आम्हाला शोधूनही सापडली नसती असे उद्गार काढल्याचे डॉ. नरेंद्र जाधव सांगितले. जे इतरांना हानीकारक नाही असे काहीही करण्याचा हक्क म्हणजे स्वातंत्र्य अशी स्वातंत्र्याची वेगळी व्याख्या सांगत नवी मुंबईत दर्दी लोकांची गर्दी असते म्हणून नवी मुंबईकरांशी सुसंवाद साधायला आवडतो अशा शब्दात त्यांनी नवी मुंबईकरांविषयीची आपली भावनी व्यक्त केली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आंभिरा सामाजिक संस्थेच्या सहयोगाने संविधान दिनानिमित्त २६ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रातील दुर्मिळ छायाचित्रांच्या तसेच विष्णुदास भावे ना़ट्यगृहात त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रव्यवहाराच्या छायाचित्रांच्या आणि त्यांनी वापरलेल्या साहित्याच्या छायाचित्र प्रदर्शनाला ३ दिवसात हजारो नागरिकांनी भेट दिली असून डॉ. नरेंद्र जाधव यांनीही प्रदर्शनाला भेट देऊन या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. डॉ. नरेंद्र जाधव यांचे बोधप्रद विचार ऐकण्यासाठी विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांनी म्हटल्याप्रमाणे दर्दींची उदंड गर्दी होती.