रविंद्र सावंत यांचे शिष्टमंडळासह एमएसईडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना साकडे
नवी मुंबई : जुईनगर व नेरूळ परिसरातील रहीवाशांना अवाजवी विद्युत देयक (वीज बिल) येत असल्याने या विद्युत देयकांची चौकशी करून सुधारीत विद्युत देयक पाठविण्याची लेखी मागणी काँग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी नेरूळ येथील एमएसईडीसीच्या कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.
सोमवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी काँग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी शिष्टमंडळासह कार्यकारी अभियंत्यांची भेट घेवून वीज देयकाबाबतची नेरूळ व जुईनगरच्या रहीवाशांची कैफीयत मांडली. या शिष्टमंडळात रविंद्र सावंत यांच्यासमवेत काँग्रेसचे सानपाडा-जुईनगर तालुकाध्यक्ष संतोष सुतार, सुशांत लंबे, संदेश साटम, कुमार यादव, गोविंद साटम, विवेक उत्तेकर, मुलानी, राजन सावंत आदी पदाधिकार्यांचा समावेश होता.
नेरूळ व जुईनगर परिसरात सध्या अवाजवी विद्युत देयक (वीज बील) येत असल्याने रहीवाशी त्रस्त व संतप्त झाले असल्याने या समस्येच्या गांभीर्याकडे मी आपले या निवेदनातून लक्ष वेधण्याचा प्रयास करत आहे. नेरूळ सेक्टर 2,4, जुईनगर सेक्टर 23,24,25 व सभोवतालच्या परिसरात आपल्या कंपनीकडून अवाजवी विद्युत देयक येत असल्याच्या तक्रारी मोठ्या संख्येने स्थानिक रहीवाशांकडून येवू लागल्या आहेत. एकीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाईच्या तुलनेत वेतनात वाढ होत नाही, उत्पन्नात वाढ होत नाही. दुसरीकडे आपल्या कंपनीकडून विद्युत देयके अवाजवी येवू लागली असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनातून व चर्चेतून कार्यकारी अभियंत्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयास केला आहे.
घरातील विद्युत उपकरणातही वाढ झाली नाही, वीजेचा वापरही पूर्वीसारखाच होत असताना अचानक विद्युत देयके अवाजवी येण्याचे प्रयोजन काय या संभ्रमात स्थानिक रहीवाशी पडले आहेत. स्थानिक रहीवाशी हे आपले वीज ग्राहक आहे. ग्राहकांच्या शंकांचे, समस्यांचे निवारण करणे आपले कर्तव्य आहे. आपण नेरूळ सेक्टर 2,4 व जुईनगर सेक्टर 23,24,25 व सभोवतालच्या परिसरात पाहणी अभियान करून ग्राहकांशी सुसंवाद करावा. या पाहणी अभियानात आम्हालाही सहभागी करून घ्यावे. रहीवाशांशी चर्चा केल्यास आपणास सत्य परिस्थितीचे अवलोकन होईल. वीज देयकांबाबत चौकशी करून सुधारीत विद्युत देयके पाठविण्याची व्यवस्था व्हावी. वाढत्या महागाईचा विचार करून जनहितार्थ विद्युत देयके वाजवी स्वरूपात यापुढे पाठविण्याची व्यवस्था करण्याची मागणी यावेळी रविंद्र सावंत यांनी निवेदनातून व चर्चेतून कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.
रविंद्र सावंत यांनी शिष्टमंडळासमवेत कार्यकारी अभियंत्याशी झालेल्या चर्चेचा गोषवारा देताना सांगितले की, वीज दर वाढल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी चर्चेत मान्य केले असून आपण त्यांना ही माहिती सर्वसामान्य रहीवाशांना देण्याची मागणी केली आहे. रहीवाशांना अंधारात ठेवून वीजदेयक दर वाढविणे चुकीचे असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.
याबाबत एमएसईडीसीचे कार्यकारी अभियंंता कुन्नरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना आपण त्यांना 0 ते 100 युनिटचे दर वेगळे व 100 युनिटच्या पुढील दर वेगळे असल्याचे आपण त्यांच्या निदर्शनास आणून दिले असून कार्यवाहीसाठी निवेदनपत्र आपण वरिष्ठांकडे पाठविले असल्याचे कुन्नरे यांनी सांगितले.