नवी मुंबई : भारतीय डाक विभागाच्या वतीने नेरूळ सेक्टर २४ येथील आगरी-कोळी भवन येथे दोन दिवसीय टपाल तिकीट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १आणि २ डिसेंबर रोजी आयोजित या टपाल तिकिटांचे भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन चीफ पोस्टमास्टर जनरल ए. के.दास यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाले.
याप्रसंगी त्यांच्या समवेत प्रसिध्द फिलाटेलिस्ट शंखा समांथा,मुंबई रीजनचे पोस्टमास्टर जनरल रणजीत कुमार, नवी मुंबई पोस्ट विभागाचे वरिष्ठ सुपरिटेंडेंट प्रकाश शेवाळे यांच्यासह भारतीय डाक विभागाचे कर्मचारी आणि शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा टपाल तिकीट महोत्सव नवी मुंबईकरांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे . यामध्ये दुर्मीळ तिकिटे पाहण्याची संधी नवी मुंबईकरांना मिळणार आहे. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी कॉर्नरची सुविधा असल्याने नागरिकांना तिकिटांसमवेत स्वत:चा फोटो काढण्याची संधी ह्या महोत्सवात दिली जाणार आहे. शाळकरी मुले, तरुणांसाठी या ठिकाणी आपल्या जवळच्या व्यक्तीला पत्र लिहून पाठविण्याची संधीही दिली जाणार आहे . या महोत्सवात १८५२ पासून ते आतापर्यंतच्या विविध प्रकारचे टपाल तिकीट प्रदर्शित करण्यात आले आहे . तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जीवन आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाला उलगडणारे टपाल तिकीटही ह्या महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे