नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात तृतीय आणि महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम क्रमांकाचे मानांकन प्रापत् झाल्यानंतर हे मानांकन उंचाविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्यावर भर देत आहेत. या अनुषंगाने बालदिनाचे औचित्य साधून १४ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत वंडर्सपार्क, नेरुळ येथे इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राच्या सहयोगाने संपन्न झालेल्या हॅप्पी किड्स फेस्टीवलला भेट देणार्या २० हजाराहून अधिक बालक-पालकांमध्ये स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करण्यात आला. यामध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती, माहिती आणि शिक्षण अशाप्रकारे क्लीन टू वीन, आय से थँक्स टू वन हू कीप्स द सिटी क्लीन, डस्टबीन आर्ट, डोनेट अ बीन असे अभिनव उपक्रम राबविण्यात आले.
याशिवाय घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे आणि इ.टी.सी. केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत यांनी महापालिका क्षेत्रातील कचरा वेचक कर्मचारी, वाहनचालक व त्यांचे पर्यवेक्षक यांच्याशी सुसंवाद साधून दैनंदिन कचरा संकलन व उघड्यावरील शौच समस्या याबाबत चर्चा केली व नवी मुंबई हागणदारी मुक्त करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे कचरा वेचकांचे कचरा संकलनाबाबतचे कार्य व कर्तव्ये तसेच व्यक्तीगत व सामाजिक सामाजिक स्वच्छतेचा स्तर उंचाविणे आणि नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तणूक याविषयी मार्गदर्शन केले.
अशाचप्रकारे भंगार वेचक व विक्रेते यांच्यासोबत डॉ. वर्षा भगत यांनी सुसंवाद साधत स्वच्छ भारत जनजागृती मोहिमेच्या अनुषंगाने सुका व ओला कचरा नागरिक पातळीवर वर्गीकरण होऊन सुका कचरा तसेच इलेक्ट्रॅानिक कचरा याबाबत त्यांची मते जाणून घेतली व चर्चा घडवून आणली. उघड्यावर शौचाबाबतचे दुष्परिणाम त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले व मार्गदर्शन केले.
भिंत चित्रणातून स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात आला असून विशेष विद्यार्थी व शिक्षक यांच्या माध्यमातून इ.टी.सी. केंद्राची भिंत रंगविण्यात आलेली आहे. भिंत चित्रणात नागरिक सहभागावर भर दिला जात असून १४ डिसेंबर २०१५ रोजी लायन्स क्लबच्या सहयोगाने अरेंजा कॉर्नर नजिक स्वच्छतेविषयक जनजागृतीपर चित्रण असणारी वॉल पेंटींग करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे १९ डिसेंबर रोजी इनरव्हील क्लब ऑफ नवी मुंबई यांच्या माध्यमातून नेरुळ येथे अशाचप्रकारची वॉल पेंटींग करण्यात येत आहे. विविध सेवाभावी व समाजसेवी संस्थांसोबत स्वच्छ भारत मिशनच्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात येत आहेत.
आपले नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर व हरित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे अनमोल योगदान अपेक्षित असून यापुढील काळात ओला व सुका कचरा नागरिक पातळीवरच वर्गीकरण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत महापौर श्री. सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांनी नागरिकांनी वैयक्तीक व सामाजिक आरोग्याचे रक्षण ही आपली जबाबदारी मानून अस्वच्छता टाळावी व स्वच्छतेबाबत नवी मुंबईचा नावलौकीक उंचवावा असे आवाहन केले आहे.