नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील स्वच्छ शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाल्यानंतर स्वच्छ नवी मुंबई मिशन हाती घेऊन नागरिकांमध्ये वैयक्तीक व सामाजिक पातळीवर स्वच्छता ठेवण्यात यावी याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. आपले नवी मुंबई शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केली जाणार नाही याविषयी काळजी घेण्याचे आवाहन विविध माध्यमातून करण्यात येत आहे.
यामध्ये महापालिका क्षेत्रातील विविध दुकाने, व्यावसायिक यांनाही त्यांच्या मार्फत अस्वच्छता केली जाणार नाही याविषयी वारंवार अवगत करण्यात येत आहे. तरीही आपली दुकाने, व्यवसाय याठिकाणी निर्माण होणारा केरकचरा, टाकाऊ पदार्थ हे सार्वजनिक ठिकाणी टाकताना आढळलेल्या व्यावसायिकांना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्या मागर्दर्शनानुसार महाराष्ट्र महापालिका अधिनियम अनुसूचि ड मधील प्रकरण १४ मधील नियम १(१), १(२), ५ (१) व ५(२) अन्वये बेलापूर विभागातील स्वच्छता अधिकारी सुनिल सगणे यांचेमार्फत घनकचरा व्यवस्थापन हाताळणी नियमाची अंमलबजावणी करणेबाबत रितसर कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
यामध्ये से. २१ नेरुळ येथील विघ्नहर सोसायटीमधील श्रीविनायक डेअरी या दुग्धजन्य पदार्थ विक्री करणार्या व्यावसायिकांस, वेलनेस फॉरएव्हर मेडीकल, प्लॉट नं. १/१ बी या औषध विक्री करणार्या व्यावसायिकांस, तसेच सुरभी ल्युमिनिअम, शॉप नं. १ या हार्डवेअर दुकानदारास नोटीसा बजाविण्यात आलेल्या आहेत.
त्याचप्रमाणे भक्ती एव्हेन्यु सोसा. से. ४६, सिवूड, नेरुळ येथील युनिक गॅलरी या मोबाईल विक्रीधारकास, शॉप नं. ८ मधील गोटीज कॉर्नर या मिठाई दुकानदारास, शॉप नं. ३ मधील चॅलेंज झेरॉक्स या झेरॉक्स दुकानदारास, शॉप नं. ११ मधील गोल्ड मेडल स्विचेस या इलेक्ट्रीकल साहित्य विक्रीधारकास, अंबिका पेंट्स या रंग साहित्य विक्रेत्यास तसेच प्लॉट नं. १२, से. ४८, नेरुळ येथील क्लासिक मेडिकल या औषध विक्रेत्यास आणि शॉप नं. १० मधील भगवती इलेक्ट्रीकल या हार्डवेअर दुकानदारास कायदेशीर नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत.
याशिवाय बेलापूर विभागीय क्षेत्रातील या १० व्यावसायिकांस त्यांच्या व्यवसायातील केरकचरा व टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट नियमानुसार करीत नसल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११५, ११६, ११७ यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे एन.आर.आय. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सूचित करण्यात आले व त्यानुसार त्यांचेमार्फत तशाप्रकारची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
तरी सर्व नागरिक, दुकानदार, व्यावसायिक, उद्योजक यांनी आपले नवी मुंबई शहर स्वच्छ, सुंदर व हरित राखण्याची आपली सामुहिक जबाबदारी स्वयंप्रेरणेने स्विकारुन आपल्यामुळे शहरात कुठेही अस्वच्छता होणार नाही याची काळजी घ्यावी आणि स्वच्छतेतून आरोग्य व आरोग्यातून समृध्दी ही त्रिसूत्री अंगीकारावी व यातून आपल्या नवी मुंबई शहराचे स्वच्छतेमध्ये देशामध्ये तृतीय क्रमांकाचे असलेले मानांकन उंचाविण्यासाठी सर्वोतोपरी योगदान द्यावे असे आवाहन महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.