नागपूर : अवघ्या १२ दिवसांतच युती सरकार नागपुरातून पळ काढणार आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन केवळ १२ दिवसांचे असेल, हे आता स्पष्ट झाले आहे. ७ डिसेंबरला अधिवेशन सुरू होत आहे आणि २३ डिसेंबरला सूप वाजेल.
पहिल्या दिवशी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद शेंडे आणि इतर मान्यवरांना श्रद्धांजली वाहिली जाईल. २२ तारखेला अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. २३ डिसेंबरला सरकारी विधेयक सादर करून सरकार निरोप घेईल. संपूर्ण अधिवेशनात सरकारी कामकाजावर भर दिसतो आहे. असे झाले तर मग विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा करायला अपुरा वेळ मिळणार आहे.
युती सरकारचे नागपूरचे हे दुसरे अधिवेशन आहे. कॉंग्रेस आघाडीच्या १५ वर्षाच्या राज्यातही नागपूर अधिवेशन तीन आठवडयांत गुंडाळले जात होते.
२००० साली नागपूर अधिवेशन सर्वाधिक म्हणजे १५ दिवस चालले. बहुतेक वेळा १२ दिवसांत अधिवेशन गुंडाळलेले दिसते. आघाडी सरकारच्या १५ वर्षात आठ वेळा अधिवेशन केवळ दोन आठवडे म्हणजे १० दिवस चालले.
२००२ साली तर हे अधिवेशन केवळ आठ दिवस चालले. यंदा कॉंग्रेस आक्रमक असल्याने अधिवेशनात वाढ होऊ घातली आहे.