नवी दिल्ली : नवोदित गोलंदाज डेन पिडटच्या फिरकीच्या जाळ्यात अडकून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चहापानापर्यंत भारतीय संघाची अवस्था ६ बाद १३९ अशी झाली. चहापानाला खेळ थांबला, तेव्हा अजिंक्य रहाणे ३१ धावांवर खेळत होता. मुरली विजय, शिखर धवन, विराट कोहली आणि रोहित शर्मा असे चार प्रमुख फलंदाज बाद करत पिडटने भारताला चांगलाच धक्का दिला.
कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारतीय सलामीवीरांना जखडून ठेवले. कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना खेळणार्या डेन पिडट या फिरकी गोलंदाजाने मुरली विजयला बाद केले. त्यानंतर धवन आणि पुजाराने डावाची पुनर्बांधणी करण्यावरच भर दिला. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा शिखर धवन ३१, तर चेतेश्वर पुजारा १४ धावांवर खेळत होते. उपाहारानंतर काईल ऍबॉटने लगेचच पुजाराचा अडथळा दूर केला.
त्यानंतर कोहली आणि रहाणेने काही प्रमाणात डाव सावरला. कोहलीने ६२ चेंडूंत सात चौकारांसह ४४ धावा केल्या. मात्र, पिडटच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षकाकडे झेल देऊन कोहली तंबूत परतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या रोहित शर्माने बेजबाबदार फटका मारत विकेट गमावली. त्याच्या जागी फलंदाजीस आलेला वृद्धिमान साहादेखील केवळ एक धाव करून बाद झाला.
या सामन्यासाठी भारतीय संघाने एक बदल केला. फिरकी गोलंदाज अमित मिश्राला वगळून वेगवान गोलंदाज उमेश यादवला स्थान देण्यात आले. दक्षिण आफ्रिकेने संघात तीन बदल केले. स्टियान वॅन झिल, कागिसो रबाडा आणि सिमॉन हार्मर यांना वगळून टेम्बा बावुमा, काईल ऍबॉट आणि डेन पिडट यांना संघात स्थान दिले.