नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश तीरथ सिंह ठाकूर यांनी देशाचे ४३ वे सरन्यायाधीश म्हणून गुरुवारी शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनात दरबार हॉलमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात राष्ट्रपति प्रणब मुखर्जी यांनी ठाकूर यांना गुप्ततेची शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या समारंभाला ठाकूर यांची आई सरस्वती ठाकुर आणि अन्य कुटूंबिय सुद्धा आले होते.
सरन्यायाधीश ठाकूर (६३) यांचा या पदाचा कार्यकाळ १३ महिने असेल. ४२ वे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू हे बुधवारी सरन्यायाधीशपदावरुन निवृत्त झाले. तर ४ जानेवारी १९५२ रोजी जन्म झालेले आणि ऑक्टोबर १९७२ साली वकील म्हणून नोंदणी झालेले न्यायमूर्ती ठाकूर ३ जानेवारी २०१७ रोजी निवृत्त होतील.
५८ हजार प्रलंबित खटले सोडवणे ही सगळ्यात मोठे आव्हान आहे, असे ठाकूर यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर सांगितले.