नवी मुंबई : सर्व प्रकारच्या अपंग व्यक्तींना एकाच ठिकाणी शिक्षण – प्रशिक्षण देणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे इ.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण केंद्र हे देशातील एकमेव केंद्र असल्याचा अभिमान व्यक्त करीत महापौर सुधाकर सोनवणे यांनी केंद्राच्या राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर केल्या जाणार्या गौरवाबरोबरच या विशेष विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहर्यावर दिसणारा आनंद हा अपेक्षापूर्तीचे समाधान देणारा आहे असे मत व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिका इ.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सुविधा केंद्राच्या वतीने जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून आयोजित विविध अपंग कल्याणकारी उपक्रमांच्या शुभारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी महापौरांसमवेत व्यासपीठावर उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेते जयवंत सुतार, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ व सौ. फशीबाई भगत, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार व अंकुश चव्हाण, इ.टी.सी. केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत, उप आयुक्त सर्वश्री सुभाष इंगळे, उमेश वाघ, सुरेश पाटील, डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता मदन वाघचौडे, सहा. आयुक्त सर्वश्री दिवाकर समेळ व दत्तात्रय नागरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महापौर व इतर मान्यवरांच्या हस्ते ब्रेल लिपीतील पुस्तकांच्या ग्रंथालयाचा तसेच संभव शिवणकाम, बुक बायडींग, संगणक प्रशिक्षण वर्गाचा आणि समुह श्रवण कक्षाचा शुभारंभ संपन्न झाला.
उपमहापौर अविनाश लाड यांनी आपल्या मनोगतात इ.टी.सी. केंद्रातील शिक्षक ज्या आत्मियतेने शिकवितात त्यामुळे त्यांचे विशेष विद्यार्थ्यांशी एक आपुलकीचे नाते जोडले जाते व यातून विद्यार्थ्यांना भावनिक आधार मिळतो आणि त्यांच्यात भविष्यात काहीतरी करुन दाखविण्याची जिद्द निर्माण होते असे सांगत या शिक्षकांचे काम स्मार्ट असल्याचे नमूद केले.
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नवी मुंबईची स्मार्ट सिटीकडे यशस्वी वाटचाल सुरु असताना सर्वच समाजघटकांचा विचार करण्यात येत असून अपंग व्यक्तींना कुठेही जाण्यायेण्याकरीता सुलभ अडथळाविरहीत वातावरण उपलब्ध करून देण्यावर विशेष लक्ष दिले जाईल व यामध्ये प्रारंभी महानगरपालिका आणि शासकीय इमारती याठिकाणी भर दिला जाईल असे सांगितले. अपंग व्यक्तींकरीता रेल्वे स्टेशन, बस स्थानके अशी गर्दीची ठिकाणे तसेच उद्याने यास्थळी विशिष्ट प्रकारची स्वच्छतागृहे उपलब्ध करुन देण्याकडे लक्ष देण्यात येईल. तसेच अपंगत्व येऊच नये यासाठीही लसीकरण व इतर माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. नवी मुंबई महानगरपालिका स्वत: तसेच सी.एस.आर. सेलच्या माध्यमातून विशेष व्यक्तींकरीता विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता सतत प्रयत्नशील आहे असेही त्यांनी सांगितले.
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून विविध अपंग कल्याणकारी उपक्रमांचा शुभारंभ करीत असतानाच संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती इ.टी.सी. संचालक डॉ. वर्षा भगत यांनी दिली. यामध्ये विशेषत्वाने अपंगांविषयीच्या सामाजिक दृष्टीकोनात बदल होण्याच्या दृष्टीने ठिकठिकाणी पथनाट्य, पपेट शो यांचे सादरीकरण तसेच न लिंक उपक्रमांतर्गत शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, पाळणाघर येथे जनजागृतीपर व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत.
यावेळी इलेक्ट्रानिक रिपेअरींग प्रशिक्षण यशस्विरित्या पूर्ण करणार्या गुणवंत विशेष विद्यार्थ्यांना प्रमाणापत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे संगणक प्रशिक्षणासाठी सहयोग देणारे डॉ. रेड्डीज फाऊंडेशन, टेलरिंग कोर्स साठी सहयोग देणारे अमेधी व इनरव्हिल क्लब तसेच बुक बायडिंग प्रशिक्षणासाठी सहयोग देणारे व्होकेशनल रिहॅबिलेटेशन सेंटर या संस्थांच्या प्रतिनिधींना सन्मानित करण्यात आले.
अपंग व्यक्तींना सहानुभूती नको तर सहभावनेचा हात द्या असे आवाहन करीत मान्यवरांनी विशेष विद्यार्थ्यांसह आकाशात फुगे सोडून प्रगती गाठण्यासाठी अपंगत्वाची मर्यादा आड येणार नाही असा संदेश प्रसारीत केला. अपंगांविषयी मोठ्या प्रमाणावर असलेले अज्ञान माहितीच्या आधारे दूर करणे तसेच अपंगांच्या गरजा व त्यांच्याशी वर्तणुक याविषयी पथनाट्यातून सादर करण्यात आलेल्या मनोरंजक प्रबोधनाला महापौर, आयुक्तांसह सर्वांनीच पसंतीची दाद दिली.