नवी मुंबई : वाहनचालक हा देखील कौशल्यपूर्ण कर्मचारी असतो या भूमिकेतून माहिती व ज्ञानात भर पडून त्यांचे कौशल्य वाढावे याकरीता आयोजित करण्यात आलेला कार्यशाळेसारखा अभिनव उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून यामध्ये वाहनचालकांच्या कामाचा सन्मान करण्याची भूमिका असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी या कार्यशाळेतून वाहन चालकांना जाणविणार्या अडीअडचणींविषयी चर्चा होईल, त्यांचे निराकरण होण्याच्या दृष्टीने सुसंवाद साधला जाईल व यामधून वाहनचालक देखील स्मार्ट होतील असा विश्वास व्यक्त केला. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाहनचालकांकरीता आयोजित स्मार्ट सिटीचे स्मार्ट सारथी दोन दिवसीय सकारात्मक दृष्टीकोन आणि कार्यनीती कार्यशाळेच्या शुभारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर महापौर महोदयांसमवेत सभागृह नेते जयवंत सुतार, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व डॉ. संजय पत्तीवार, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे, वाहन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, महापालिका सचिव सौ. चित्रा बाविस्कर, सहा. आयुक्त दिवाकर समेळ, कार्यशाळेचे मार्गदर्शक व्याख्याते सुरेश लाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सभागृह नेता जयवंत सुतार यांनी आपल्या मनोगतात वाहनचालकांवर सुरक्षेची मोठी जबाबदारी असल्याचे सांगत अपघातविरहीत सेवा देण्याच्या दृष्टीने तशाप्रकारची मानसिकता विकसित करणे व तणावमुक्त जगण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याची गरज विषद केली. नवी मुंबई महानगरपालिकेचे वाहनचालक हे अनुभवी असून सुरक्षित वाहन चालवितात असेही त्यांनी नमूद केले.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन अशाप्रकारची कार्यशाळा आयोजित केली याबद्दल कौतुक करीत सध्या अपघात ही वाढती समस्या असल्याचे सांगत देशात दर सहाव्या मिनिटाला एक अपघात होतो व त्यातील ७० टक्के अपघात मानवी दोषामुळे होतात अशी माहिती दिली. हे अपघात वाहतुक चिन्हांची माहिती नसणे किंवा माहिती असूनही त्याकडे दूर्लक्ष करणे यामुळे होत असल्याचे निदर्शनास आणून देत त्यांनी वाहनचालकांचे त्यादृष्टीने प्रबोधन होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. वाहनचालकाला इंग्रजीतील ओव्हर स्पीड, ओव्हर टेकींग, ओव्हर कॉन्फीन्डन्स, ओव्हर लोड हे चार ‘ओ’ घातक असल्याचे सांगत त्यांनी सुरक्षित वाहन चालवून वाहन संस्कृती जोपासण्याची गरज व्यक्त केली.
प्रास्ताविकपर मनोगतात अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी कार्यशाळेविषयी माहिती देताना वाहनचालकांना वाहनातील सर्वच गोष्टींची माहिती असते, मात्र त्यांना अनेक प्रकारच्या नवनवीन गोष्टींची माहिती व्हावी तसेच त्यांच्यावर दैनंदिन कामकाजात असलेला ताणतणाव दूर व्हावा व वाहनचालकांसमोरील अडचणींना दिशा देता यावी आणि त्यांचे प्रबोधन होणे याकरीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. वर्षातून दोनदा वाहनचालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार यांनी सौजन्यशील दृष्टीकोन जपणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे वाहनचालक कार्यशाळेनंतर अधिक सुरक्षित व दर्जेदार वाहनचालक होतील असा विश्वास व्यक्त केला.
चाळीसहून अधिक नामवंत उद्योग समुहातील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्याकरीता १२ हून अधिक वर्षे प्रशिक्षण कार्यक्रम राबविणारे प्रसिध्द समुपदेशक, व्याख्याते सुरेश लाड हे दोन दिवसात विविध सत्रात वाहनचालकांशी सुसंवाद साधत त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणार आहेत तसेच कार्यनीतीविषयी प्रबोधन करणार आहेत.