इंदूर : ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘पिंगा’ गाण्यामुळे वाद झाला होता. हा वाद शांत होतो ना होतो तोच चित्रपटातील ‘मल्हारी’ या गाण्यामुळे पुन्हा नवीन वादाला तोंड फुटले आहे. मल्हारी गाण्यात बाजीराव पेशवे नृत्य करत असल्याचे दाखवल्याने बाजीराव मस्तानीचे वंशज संतापले आहेत.
‘पेशव्यांच्या इतिहासाचा खेळ चालवला असून गल्ला जमवण्यासाठी भन्साळींनी पेशव्यांच्या इतिहासाचा वापर केला आहे. त्यामुळे बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थिगिती द्यावी’, अशी याचिका मध्यप्रदेश उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
बाजीराव-मस्तानी यांची आठवी पिढी इंदूर येथे वास्तव्यास आहे. त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. ‘बाजीराव सारख्या महान योद्धावर चित्रपट करतांना भन्साळी यांनी पेशवेकालीन इतिहासाचा अभ्यास करायला पाहिजे होता, पण पैसे कमवण्याच्या हेतूने त्यांनी पेशवे कालीन इतिहासाचा वापर केल्याचे दिसत आहे, त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे.
काही दिवसांपुर्वी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘पिंगा’ गाणे प्रदर्शित झाले होते. त्यामध्ये प्रियंका चोप्रा आणि दीपिका पादुकोण म्हणजेच ‘काशीबाई’ आणि ‘मस्तानी’ यांचे एकत्र नृत्य दाखवले आहे, त्यामुळे सर्वत्र एकच दंगा झाला होता. त्यानंतर आता नुकताच रिलीज करण्यात आलेल्या ‘मल्हारी’ या गाण्यात खुद्द बाजीराव नृत्य करत असल्याचे दाखवण्यात आल्याने हा संताप व्यक्त करण्यात आला आहे.