नवी मुंबई : ३ डिसेंबर या जागतिक अपंग दिना चे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका सर्व शिक्षा अभियान समावेशित शिक्षण उपक्रम यांच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. २८ वाशी येथील संसाधन कक्षामध्ये विशेष गरजा असणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण व विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षण विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगिरे यांचे हस्ते शुभारंभ संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी सहा. आयुक्त तथा शिक्षणाधिकारी बाळकृष्ण पाटील तसेच शिक्षण विस्तार अधिकारी रुतिका संखे व सौ. सुलभा बारघरे उपस्थित होते.
याप्रसंगी विशेष विद्यार्थ्यांनी समावेशित शिक्षण उपक्रमाच्या माध्यमातून संपादन केलेल्या यशाचा परिचय करुन देण्यात आला व गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यामध्ये दूरचित्रवाहिनीवर गाण्याचा कार्यक्रम सादर करणारा विद्यार्थी रिहान शाहीद खान, अस्थिव्यंग अपंगत्वामुळे शाळाबाह्य असलेला व सध्या नियमित विद्यार्थी झालेला दर्शन विजय सुर्वे, प्रत्येक वर्षी अ श्रेणीत उत्तीर्ण होत उत्तम रितीने ब्रेलर चालविणारा अंध विद्यार्थी गौरव कोळेकर, सुरुवातीला पेन्सीलही हातात धरता न येणारी मात्र आता वाचन – लेखन करत सर्व उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभागी होणारी मतिमंद विद्यार्थीनी स्नेहल काटे, बहुविकलांगतेवर मात करुन महानगरपालिकेच्या चिंचपाडा शाळेत उत्तम शिक्षण घेणारी विद्यार्थिनी नेहा दबडे, अशाचप्रकारचा बहुविकलांग हुशार विद्यार्थी सलमान मुबीन खान, कर्णबधीरत्वावर मात करीत उत्तमरीत्या वाचाकौशल्य विकसित झालेली विद्यार्थिनी नुतन कांबळे, स्पर्शालाही दचकुन प्रतिसाद देणारा मात्र आता ब्रेल लिपी सहज वाचन लेखन करणारा आणि गणितीय आकडेमोड करणारा अंध विद्यार्थी श्रेयस गर्जे या विशेष विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या विद्यार्थ्यांपासून प्रेरणा घेऊन इतरही विद्यार्थी घडतील व सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही या विशेष विद्यार्थ्यांकडून जिद्द व क्षमताविकास शिकता येईल असे मत व्यक्त करीत शिक्षण उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांनी स्वानुभवकथनातून उपस्थित विद्यार्थी व पालकवर्गास मार्गदर्शन केले.
यावेळी मतिमंद विद्यार्थ्यांसाठी धावणे, बकेटमध्ये बॉल टाकणे, फुगे पोडणे तसेच अंध व अंशत: अंध विद्यार्थ्यांसाठी रेतीमधून नाणी शोधणे, मटका फोडणे, स्मरणशक्ती या खेळांचे आयोजन करण्यात आले होते तसेच अस्थिव्यंग विद्यार्थ्यांसाठी चमच्याने रेती भरणे, बाटली पाडणे व कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी धावणे, बटाटा शर्यत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धांमध्ये शंभरहून अधिक विशेष विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. दुसर्या सत्रात राष्ट्रीय मानसिक विकलांग संस्था (एन.आय.एच.एम.) क्षेत्रीय केंद्र, बेलापूर नवी मुंबईचे व्याख्याते विशाल गाणार यांनी पालकांशी संवाद साधला व त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.