वाळूज – घराच्या गच्चीवर झोपलेल्या वृध्देच्या तोंडावर पाटा घालून तिचा निर्घृण खून केल्याची घटना बुधवारी (ता. दोन) सकाळी सातदरम्यान उघड झाली. खुनानंतर तिच्या अंगावरील दागिनेही मारेकर्यांनी ओरबाडून नेले, तसेच रोकडही लांबवली. वाळूज व सिडकोत काही तासांतच दोन खून झाले. या दोन्ही खुनांची पद्धत एकच असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
सखूबाई आत्माराम महाजन (वय ६७, रा. मनीषनगर, वाळूज) या मुलगा समाधान (वय २९) व सुनेसह हसन पठाण यांच्या रो-हाऊसमध्ये भाड्याने राहत होत्या. पोलिसांनी सांगितले की, सखूबाईचे सुनेशी सतत वाद होत. यामुळे काही दिवसांपूर्वीच घरमालकाने त्यांना घर सोडण्यास सांगितले होते. त्यानुसार मुलगा समाधान पत्नी व मुलांसह याच भागात एक घर भाड्याने घेऊन २९ नोव्हेंबरला आईपासून वेगळे राहायला गेला. त्यामुळे मंगळवारी (ता. दोन) रात्री समाधानची पत्नी व मुले नव्या घरात झोपण्यासाठी गेले. तर सखूबाई जुन्याच घरातील छतावर सामानाची देखरेख करण्यासाठी झोपल्या होत्या.
बुधवारी (ता. दोन) पहाटे चारच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी सखूबाईच्या घरात प्रवेश केला. गच्चीवर झोपलेल्या सखूबाईच्या डोक्यात पाटा घालून अंगावरील ७० हजारांचे दागिने, सुमारे एक किलो चांदी व ५० हजार रुपये लंपास केले. सकाळी हा प्रकार दिसताच शेजार्यांनी समाधानला फोन करून बोलावले. आईचा खून झाल्याचे समजताच त्याने वाळूज पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह घाटीत उत्तरीय तपासणीसाठी नेला. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाली.
दशमेशनगर येथे १४ ऑक्टोबरला मिश्रीलाल बरडीया यांना ओलीस ठेवून चोरांनी लूट केली होती. मंगळवारी (ता. दोन) वाळूजच्या मनीषनगर व सिडको एन-नऊ, एम-दोन भागात दोन वृध्दांचे खून झाले. या प्रकारांनी शहरच हादरले असून, वृध्दांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.