* नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह ८ कार्यकर्त्यांना अटक.
* जप्त डाळ साठा रेशनवर उपलब्ध करा, साठेबाज व्यापार्यांवर छापेमारी सुरु ठेवा ! मनसेची मागणी
नवी मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सर्वसामान्यांच्या ताटातील डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्याच्या निषेधार्थ मनसेने महाराष्ट्र भर आंदोलन करून याचा निषेध केला आहे. आज मुंबई मंत्रालयात नवी मुंबई मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली जप्त डाळ साठा रेशनवर उपलब्ध करा व साठेबाज व्यापार्यांवर छापेमारी सुरूच ठेवा अन्यथा गिरीश बापटांनी राजीनामा द्या, या मागणीसाठी मंत्री गिरीश बापटांच्या दालनाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली.याप्रसंगी मनसे कार्यकर्त्यांनी भाजप सरकारचा सत्तेचा थाट, जनतेच्या पुढ्यात महागाईचे ताट, भाजप सरकार सत्तेत मस्त, तुरडाळीने केलय जीवन त्रस्त, व्यापार्यांच्या जीवावर फडणवीस सरकार, महागाईने केलाय हाहाकार, मंत्री व्यापार्यांनी खाल्ली मोठी दलाली, जनता मात्र महागाईने होरपळली अशा विविध घोषणा देत मंत्रालय परिसर दणाणून सोडला.
विविध माध्यमे, संस्था, संघटना व मनसेने राज्यभर केलेल्या आंदोलनांनंतर साठेबाजी करणार्या व्यापार्यांवर डाळसाठीचे निर्बंध सरकारने घातले. (दि.१९ ऑक्टोबर २०१५). या छापेमारीत राज्यात ८७ हजार टन व मुंबईत ६७ हजार टन डाळ जप्त करण्यात आली. मुळातच ही डाळ सर्वसामान्यांपर्यंत उपलब्ध होण्यासाठी शासनाने तात्काळ रेशनच्या दुकानावर, सहकारी तत्वावर चालणार्या अपना बाजार, विविध सहकारी भंडारे, मुंबई ग्राहक पंचायती सारख्या संघटनांची वाटप व्यवस्था अशा माध्यमांतून ग्राहकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे होते. मात्र सरकारने त्याच व्यापार्यांच्या घशात ही डाळ घालण्याच्या उद्देशाने व्यापार्यांनाच डाळ १०० रुपयात विकण्याचे आदेश दिले. त्याचा मनसेने जाहीरपणे निषेध केला आहे.
तर गेली महिनाभर या साठेबाजी करणार्या व्यापार्यांवर होणारी छापेमारीसुद्धा सरकारने बंद केली आहे. त्यामुळेच आज मंत्रालयात मंत्री गिरीश बापटांच्या दालनाबाहेर आंदोलन केल्याचे नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
या आंदोलनात शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासमवेत निलेश बाणखेले, नितीन चव्हाण, सुधीर नवले, रुपेश कदम, सनप्रीत तुर्मेकर, स्वप्नील गाडगे, सागर नाईकरे सहभागी होते.