* प्रभाग ८७च्या नगरसेविका सौ. सुनिता मांडवेंचे आयुक्तांना लेखी निवेदन
* अन्यथा काळ्या फिती लावून निषेध नोंदवित कार्यक्रमात सहभागी होण्याचा नगरसेविका मांडवेंचा इशारा
नवी मुंबई : महापालिकेच्या कार्यक्रमातील निमत्रंणपत्रिकेवर पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख आवर्जून करण्याची लेखी मागणी महापालिका प्रभाग ८७ मधील शिवसेनेच्या नगरसेविका व विधी समिती सदस्या सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून नुकताच २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत संविधान दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला याच दिनी संविधान समर्पित केले असल्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व कृतज्ञतेच्या भावनेतून साजरा होणे स्वाभाविकच आहे. महापालिकेच्या निमत्रंण पत्रिकेवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व आमचे शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदेंचा कोठेही नामोल्लेख नसावा, ही बाब निश्चितच खटकण्यासारखी आहे. महापालिकेने आपल्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून कोणाला निमंत्रित करावे हा त्यांचा अधिकार आहे, त्याबाबत बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही. परंतु ना. एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असून नवी मुंबई महापालिका ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात आहे. महापालिका प्रशासनाने त्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पालकमंत्र्यांचा उल्लेख का केला नाही हा प्रश्न सर्वसामान्यांनाही पडलेला आहे. महापालिका प्रशासनाने यापुढील त्यांच्या कार्यक्रमाच्या निमत्रंण पत्रिकेवर पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करावा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांना प्रत्येक कार्यक्रमाचे निमत्रंण देण्याची मागणी शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी मनपा आयुक्तांकडे या निवेदनातून केली आहे.
संविधान दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्याच नावाचा निमत्रंण पत्रिकेवर उल्लेख नसावा, संविधानदिनीच अशी चुक मनपा प्रशासनाकडून घडावी ही गंभीर बाब आहे. यापुढे मनपाच्या कार्यक्रमामध्ये पालकमंत्र्यांचा विसर पडू नये ही कळकळीची विनंती करून नगरसेविका मांडवे यांनी महापालिकेच्या सार्वजनिक कार्यक्रमात यापुढे प्रशासनाला पालकमंत्र्यांचा विसर पडल्यास आम्हाला नाईलाजास्तव काळ्या फिती लावून कार्यक्रमात सहभागी होवून आमचा लोकशाहीच्या चौकटीत निषेध नोंदवावा लागेल, याची आपण दखल घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे.