मुंबई : १ डिसेंबरपासून होणार्या मेट्रो भाडेवाढीतून प्रवाशांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. येत्या १७ डिसेंबरला मेट्रो भाडेवाढीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे मेट्रो तिकीटदरात होणारी वाढ तूर्तास टाळण्यात आली असल्याचे ‘मुंबई मेट्रो वन प्रायवेट’द्वारे (एमएमओपीएल) सोमवारी सांगण्यात आले.
‘दर निश्चित समिती’ने जुलै महिन्यात मेट्रोची प्रस्तावित भाडेवाढ जाहिर करत १० ते ११० रुपयापर्यंत तिकीटदर आकारले होते. बस, रिक्षा, टॅक्सी, लोकल प्रवास महागल्याने चाकरमान्यांचे कंबरडे आधीच मोडले आहे. अशात १ डिसेंबर पासून मेट्रोचा प्रवास महागणार असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच भूर्दंड पडणार होता.
‘मुंबई मेट्रो वन प्रायवेट लिमिटेड’द्वारे (एमएमओपीएल) तिकीटदरात ५ रुपयांनी वाढ करणार असल्याचे गेल्या आठवड्यात जाहिर केले गेले. वर्सोवा ते घाटकोपर मार्गावरील प्रवासासाठी १०, २०, ३० आणि ४० रु. मोजावे लागत होते. पण १ डिसेंबरपासून प्रवाशांना १०, २०, २५, ३५ आणि ४५ रु. मोजावे लागणार होते. मात्र भाडेवाढीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने येत्या १७ डिसेंबरपर्यंत ही भाडेवाढ टळली आहे.