खासदारनिधीतून झालेल्या नागरी कामांचे लोकार्पण
भाईंदर : प्रतिनिधी
खासदारकीच्या पाच वर्षाच्या कालखंडात लोकाभिमुख आणि मिरा-भाईंदर, ठाणे तसेच नवी मुंबई शहरांसाठी भूषणावह ठरतील, अशा विकास योजना व प्रकल्प साकारले आहेत. मिरा-भाईंदरकरांनी दिलेली संधी आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझयावर टाकलेला विश्वास आज सार्थ ठरत असल्याबद्ल मला अत्यंत आनंद होत असल्याच्या भावना ठाणे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार संजीव नाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.
नाईक यांनी खासदारकीच्या यशस्वी कालखंडात ठाणे लोकसभा मतदारसंघात अनेक विकास योजनांची पुर्तता केली आहे. खासदारनिधीतून भाईंदर पश्चिमेकडील नगरसेविका दक्षता पाटील यांच्या प्रभागात प्रभाग क्रं ४७ मध्ये अद्ययावत स्वच्छतागृह आणि समाजमंदीर बांधण्यात आले आहे. तर नगरसेविका अनिता परमार आणि प्रणाली पाटील यांच्या प्रभाग क्रमांक २७ मध्ये समाजमंदीर बांधण्यात आले आहे.
मिरा-भाईंदर पालिकेच्या हददीतील घोडबंदर खाडीकिनारी श्री गणेशघाटातील पुर्नबांधणी करुन प्रशस्त रस्ता निर्माण करण्यात आला आहे. या तीन्ही कामांचे लोकार्पण डॉ. नाईक यांच्या हस्ते रविवारी झाले. त्याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सर्वसामान्य जनता त्यांच्या समस्या आपल्याकडे घेऊन येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा त्या समस्या सोडविण्यासाठी जनतेच्या दारात स्वतःहून पोहचा असा सल्ला नाईक यांनी कार्यक्रमास उपस्थित लोकप्रतिनिधींना यांना दिला. आपण नागरिकांना दिलेल्या वचनाची पूर्तता होत असल्याचे सांगत सर्व धर्म समभावनेची शिकवण देणार्या मीरा-भाईंदर येथील नागरिकांना हे समाज मंदिर खर्या अर्थाने चांगल्या विचारांचे व्यासपीठ निर्माण करुन देणारे ठरेल, असा आशावादही व्यक्त केला.
या उद्घाटन कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मिरा-भाईंदरचे जिल्हाअध्यक्ष मोहन पाटील, नगरसेवक धु्रवकिशोर पाटील, नगरसेविका अनिता परमार, नगरसेविका दक्षता पाटील, नगरसेविका शिल्पा भावसार, नगरसेविका प्रणाली पाटील त्याच बरोबर प्रमुख उपस्थितीत जेष्ठ समाजसेवक शांताराम ठाकूर, केशव घरत, योगेंद्र जोशी आदी मान्यवर, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी, नागरिक आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
खासदारकीच्या कालखंडात नाईक यांनी सर्व सामान्यांसाठी केलेल्या विविध विकासकामांची माहिती जिल्हाअध्यक्ष मोहन पाटील यांनी दिली. आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले.