नवी मुंबई : देशातील स्वच्छ शहरांमध्ये तृतीय क्रमांकाचे व राज्यातील सर्वात स्वच्छ शहराचे मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस केंद्र सरकारमार्फत जाहीर झाले असून हे मानांकन उंचावण्यासाठी सर्व पातळीवरुन प्रयत्न करण्यात येत आहेत. ई टॉयलेट पाठोपाठ आता महिलांसाठी स्पेशल SHE टॉयलेट ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे.
लोकनेते गणेश नाईक यांनी याबाबत पुढाकार घेतला असून रिलायन्स फाऊंडेशन यांचेसोबत झालेल्या चर्चेअंती फाऊंडेशनने पत्र देऊन महिलांसाठी विशेष १२ SHE टॉयलेट CSR अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेस उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले असल्याची माहिती स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा आशिष शिर्के यांनी दिली आहे. याव्दारे स्वच्छतेच्या दृष्टीने महिला भगिनींना सार्वजनिक ठिकाणी जाणवणार्या स्वच्छतागृहांचा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले जात आहे.
इतर कोणत्याही शहराप्रमाणेच आज नवी मुंबईतही अनेक महिला नोकरी, व्यवसाय करताना मोठ्या कालावधीत घराबाहेर असतात. अशावेळी महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांची कमतरता भासते. याविषयी अनेक नगरसेविकांनी महिलांची ही अडचण गणेश नाईक यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी ती दूर करण्याकडे विशेषत्वाने लक्ष दिले व रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातूनCSR अंतर्गत १२ SHE टॉयलेट बांधण्यास फाऊंडेशनचे सहमतीपत्र प्राप्त झालेले आहे.
साधारणत: प्रत्येकी १० ते १२ लक्ष रक्कमेच्या या SHE टॉयलेटमध्ये सॅनिटरी नॅपकिन इनसिनरेटर, सॅनिटरी नॅपकिन वेन्डींग मशीन अशा महिलांसाठी विशेष सुविधा असणार आहेत. रेल्वे स्टेशन्स, बसडेपो अशा महिलांच्या वर्दळीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ नवी मुंबई मिशन अंतर्गत रिलायन्स फाऊंडेशन यांच्या सहयोगाने उडठ च्या माध्यमातून १२ SHE टॉयलेट बसविण्यात येत असल्याची माहिती देत स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के यांनी महिलांच्या अडचणींची दखल घेऊन लोकनेते गणेश नाईक यांनी तत्पर कार्यवाही केल्याबद्दल समस्त नवी मुंबईकर महिला भगिनींच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत.