नवी मुंबई : स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राज्यातील १० शहरांमध्ये नवी मुंबईची निवड होऊन देशातील ९८ शहरांमधून दुसर्या टप्प्यातील १० शहरांच्या निवडीसाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. यामध्ये नागरिकांच्या संकल्पनांना विशेष महत्व देण्यात येत असून विविध क्षेत्रातील नागरिकांशी सुसंवाद साधण्यात येत आहे. अशाच प्रकारचे सुसंवाद चर्चासत्र आयोजित करीत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत सुसंवाद साधला व नवी मुंबई स्मार्ट सिटी विषयी त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या तसेच पत्रकारांनी सुचविलेल्या प्रत्येक सूचनेची नोंद घेत भाष्य केले. प्रारंभी शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी सादरीकरणाव्दारे स्मार्ट सिटी मिशनची माहिती दिली. याप्रसंगी मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर व कार्यकारी अभियंता संजय देसाई उपस्थित होते.
वृत्तपत्र, वृत्तचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून नवी मुंबईतील घडामोडींची माहिती सर्वदूर पसरत असते. शहरातील अनेक बाबींशी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी संलग्न असतात. त्यामुळे पत्रकारांच्या संकल्पना-सूचना महत्वाचे असल्याचे सांगत महापालिका आयुक्त यांनी स्मार्ट नवी मुंबई शहरात रेट ऑफ रेटींगव्दारे निश्चित क्षेत्र विकास करुन त्याठिकाणच्या सर्वांगीण नागरी सुविधा विकासाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. यामध्ये कमीत कमी खर्चात दर्जेदार व गुणात्मक सेवा पुरविण्यावर भर देण्यात येणार असून स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत केंद्र सरकार, राज्य शासनामार्फत प्राप्त होणारा निधी व काही प्रमाणात महानगरपालिकेच्या निधीतून पाच वर्षाच्या कालावधीत हा क्षेत्र विकास करावयाचा आहे. सन २०३० पर्यंत याच धर्तीवर इतरही क्षेत्रांचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
अडथळा विरहीत चालण्यायोग्य फुटपाथ, परिवहन सेवेचे सक्षमीकरण, अपारंपारीक ऊर्जा वापरावर भर, विज बचत, पार्किंग करीता उपाययोजना अशा विविध गोष्टींना यापुढील काळात प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना येथील नागरिकांच्या संकल्पनांना महत्व देण्यात येत असल्याचे स्पष्ट करीत २.७५ लाखांहून अधिक नागरिकांनी आपल्या सूचना – संकल्पना नोंदवून उत्तम प्रतिसाद दिल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित ५० हून अधिक वृत्तपत्र व वृत्तचित्रवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी मौलिक सूचना केल्या. जलवाहतूकीला प्राधान्य, आरोग्यपूर्ण नवी मुंबईसाठी योगा सेंटरची निर्मिती, गावठांण व झोपडपट्टी भागाचा समतोल विकास, नाले प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना, तलाव सुशोभिकरणातून मनोरंजन केंद्र विकास, आपत्ती निवारा केंद्र, एक खिडकी योजनेचे सक्षमीकरण, पर्यटनस्थळांचा विकास, पदपथांचे सारखे नियोजन व सुशोभिकरण, ओला कचरा व सुका कचरा नागरिक पातळीवरच वेगवेगळा ठेवण्यासाठी उपाययोजना, प्रवासी सेवा सक्षमीकरण, अग्निशमन यंत्रणा सक्षमीकरण, इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु करणे, हागणदारीमुक्त शहरासाठी प्रयत्न, स्मार्ट इ-गव्हर्नन्स, पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन अशा विविध बाबींवर पत्रकारांनी मौल्यवान सूचना केल्या तसेच लिखित स्वरुपात सूचनापत्रेही भरून दिली. या प्रत्येक सूचनेबाबत बोलत महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी या उल्लेखनीय संकल्पना – सूचनांचा उपयोग स्मार्ट शहर निर्मितीत होईल असे सांगितले व सर्वांचे आभार मानले.