नवी मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली समतेची विचारधारा देशाला प्रगतीच्या मार्गाने घेऊन जाणारी असून त्या विचारांचा सर्वांनी अंगिकार करणे हीच त्यांना वाहिलेली आदरांजली आहे असे मत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, दादर येथे अभिवादन करण्यासाठी जाणार्या नागरिकांकरीता सी.बी.डी बेलापूर येथे उड्डाणपुलाजवळील मुख्य चौकाशेजारी सुविधा कक्ष उभारण्यात आला होता व त्या ठिकाणी अल्पोपहार, चहापान व्यवस्था करण्यात आली होती. त्या कक्ष भेटीप्रसंगी महापौरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या सुविधा कक्षास महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, सभागृह नेते जयवंत सुतार, परिवहन समिती सभापती साबू डॅनिअल, आरोग्य समिती सभापती पुनम पाटील, विद्यार्थी व युवक कल्याण समिती सभापती गिरीश म्हात्रे, नगरसेविका सुरेखा नरबागे, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, सहा.आयुक्त संध्या अंबादे व दत्तात्रय नागरे यांनी भेट दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सांगितलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचे पालन सर्वांनीच करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याप्रसंगी केले.
***************************
महापालिका मुख्यालयातील ऍम्पीथिएटर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेते जयवंत सुतार, आरोग्य समिती सभापती पुनम पाटील, विधी समिती सभापती भारती पाटील, विद्यार्थी व युवक कल्याण समिती सभापती गिरीश म्हात्रे, नगरसेवक डॉ.जयाजी नाथ, रविंद्र इथापे व सुरेखा नरबागे, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, उपआयुक्त सर्वश्री डॉ. बाबासाहेब राजळे, सुभाष इंगळे, सुरेश पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक परोपकारी, कार्यकारी अभियंता संजय देसाई, अरविंद शिंदे, सुनिल लाड, सहा.आयुक्त दत्तात्रय नागरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.