मुंबई : सीएसटी रेल्वे स्थानकावर मंगळवारी पहाटे फ्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उपनगरीय रेल्वे बंफरला धडकून भीषण अपघात झाला. यामुळे लोकलचे दोन डबे घसरले.
पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याने कोणीही जखमी झालेले नाही. मात्र यामध्ये फ्लॅटफोर्मचे आणि लोकलचे मोठे नुकसान झाले. हा अपघात कशामुळे झाला याचे कारण अद्यापही समजलेले नाही. पहाटेची वेळ असल्याने स्थानकावर प्रवाशांची गर्दी नव्हती. त्यामुळे मोठा अपघात टळला.
लोकल शंटींगच्या वेळी ही घटना घडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सकाळी सहाच्या सुमारास फ्लॅटफॉमवरील दोन डबे हटवण्यात आले असून ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे मध्य रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी लोकल अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी जून महिन्यात चर्चगेट रेल्वे स्थानकात रेल्वे फलाटाला धडकून अपघात झाला होता. त्यात मोटरमनसह पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले होते.