नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी कॉंग्रेस राष्ट्रवादीने शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरली आहे. विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधकांनी निदर्शने करत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सोमवारपासून सुरु झाले आहे. पहिल्या दिवशी संयमाची भूमिका घेणारे विरोधक दुसर्या दिवसापासूनच सरकारवर हल्लाबोल सुरु केला आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर केवळ कर्जमाफी हाच पर्याय उरल्याचे सांगत विरोधकांनी विधीमंडळाबाहेर निदर्शने केली. आज सकाळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायरीवर बसून निदर्शने केली. त्यानंतर विधानसभेत जाऊ अध्यक्षांच्या समोर जाऊन घोषणाबाजी केली.
शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकर्यांना पॅकेज दिलेच पाहिजे अशा घोषणा घेत सरकारचा निषेध नोंदवला. आपल्याला माहित असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी हा एकमेव पर्याय नसल्याचे म्हटले होते. विरोधकांनी हाच मुद्दा लावून धरत कर्जमाफी हाच पर्याय असल्याचे ठासून सांगितले आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, अजित पवार, छगन भुजबळ आदी नेते आंदोलनात सहभागी झाले होते.
सोमवारी पहिल्याच दिवशी वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून शिवसेना-भाजप आमने सामने आले. त्यानंतर राष्ट्रवादीने संत्राफेक आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. मंगळवारी कर्जमाफी, नापिकीसारख्या मुद्द्यावर विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकर्यांच्या विविध मागण्यांचे फलक घेऊन सकाळीच विधान भवनाच्या पायर्या गाठल्या. बिजेपी सरकार मे गडबड झाला है, सरकार की दाल मे कुछ काला है.’ असा मजकूर असलेले फलक घेऊन विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले. सरकारने शेतकर्यांला वार्यावर सोडले आहे. राज्यात नापिकी असल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे कर्जमाफीशिवाय पर्याय नाही. अशी मागणी विरोधकांनी केली आहे.