कल्याण : शहरांचा स्मार्ट विकास साधताना खेडे गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष नको यासाठी राज्य सरकारने महत्वपूर्ण पाऊल उचलीत आमदार आदर्श ग्रामयोजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून आमदारांनी आपल्या मतदार संघातील तीन गावे दत्तक घेऊन त्याच्या विकासाचे नियोजन करून सदरचे गाव आदर्श करण्याचे धोरण राज्य सरकारने आखले आहे. याच आमदार आदर्श ग्रामयोजनेसाठी कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील ‘नांदप’ हे पहिले गाव दत्तक घेतले आहे. नांदप ग्रामस्थांच्या सहकार्याने पुढील काळात विकासकामांच्या माध्यमातून गाव आदर्श करण्याचा निर्धार आमदार नरेंद्र पवार यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत व्यक्त केला.
यावेळी या सभेला नांदप गावच्या सरपंच कुसुमताई बष्टे, उपसरपंच अरविंद शेलार, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे, सहाय्यक गटविकास अधिकारी पवार, नायब तहसीलदार डॉ कदम, पाणी पुरवठा उपअभियंता राऊत, कल्याण तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, ग्रामसेवक हरेश घरत आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या ग्रामसभेच्या माध्यमातून आमदार नरेंद्र पवार यांनी उपस्थितांना आमदार आदर्श ग्राम योजनेबाबत माहिती दिली. यावेळी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना संजीवनी ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील पाणीपुरवठा योजना थकीत वीज बिलामुळे बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदरचे थकीत वीज बिल मी स्वतः भरून पाणीपुरवठा योजना तात्काळ कार्यान्वयित करणार असल्याचे आश्वासन आमदार पवार यांनी ग्रामस्थांना दिले. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, राज्यसरकार आणि आमदार विकासनिधीच्या माध्यमातून सुमारे ३.३५ कोटींचा ग्रामविकास आराखडा तयार करून ’नांदप’ गावाचा आदर्श विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या विकास आराखड्याच्या माध्यमातून गावातील रस्ते बांधणी आणि मजबुतीकरण, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, दिवाबत्ती योजना, मलनिःसारण योजना, भूमिगत गटार योजना आरोग्य सुविधा आदी माध्यमातून स्मार्ट विकास करणार असल्याची माहिती आमदार पवार आणि अधिकार्यांनी ग्रामसभेला दिली.
दरम्यान शासनाच्या या महत्वपूर्ण योजनेतून ‘नांदप’ गाव आदर्श ग्राम करण्यासाठी ग्रामस्थांची सकारात्मक मदत होईल अशी अपेक्षा आमदार पवार यांनी ग्रामसभेपुढे व्यक्त करीत ग्रामसभा संपवून गावाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान ग्रामस्थांनी अनेक समस्या आमदारांना सांगितल्या. यावेळी आगामी काळात शासकीय योजनांच्या माध्यमातून गावातील सर्व नागरीसमस्या कायमस्वरूपी सोडवण्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले.