नवी मुंबई : ठाणे मतदारसंघाचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक यांच्यासह ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वर नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांची पोलीस सुरक्षा व्यवस्था डिसेंबर २०१५पासून अचानक काढून घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या निर्णयाविरोधात संपूर्ण नवी मुंबईतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या संदर्भात आज महापौर सुधाकर सोनावणे यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, शहर महिलाअध्यक्षा माधुरी सुतार, पालिकेतील सभागृहनेते जयवंत सुतार, पक्षप्रतोद डॉ.जयाजी नाथ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांची भेट घेतली आणि काढून घेतलेली सुरक्षा तातडीने परत प्रदान करण्यासाठी वैयक्तिक विवेदने दिली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना देखील निवेदन देण्यात आले आहे.
संजीव नाईक यांनी नवी मुंबईचे महापौरपद भूषविले असून ठाणे मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीत्व लोकसभेत केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ते राज्यस्तरीय नेते असून पक्षाचे प्रदेश सरचिटणीसपदी कार्यरत आहेत. ज्ञानेश्वर नाईक हे गेली अनेक वर्षे समाजसेवक म्हणून कार्यरत असून नवी मुंबई महापालिकेचे ते माजी नगरसेवक देखील आहेत. तर सागर नाईक यांनी एप्रिल २०१५पर्यंत शहराचे महापौरपद भूषविले आहे.
गेली अनेक वर्षे हे तिघे सार्वजनिक क्षेत्रात सक्रीय आहेत, राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करीत आहे. या सर्वांचा जनसंपर्क दांडगा असून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी हे तिघे नेहमी लोकांच्या समुहामध्ये वावरत असतात. विविध क्षेत्रात काम करीत असताना काही वेळा लोकहिताचे निर्णय घेताना काही अपप्रवृत्तीच्या व्यक्ती दुखावल्या जाण्याची शक्यता असते. या प्रवृत्तींपासून या तिघांना नेहमीच धोका संभवतो. त्यामुळेच गेली अनेक वर्षे त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली होती. ही सुरक्षा अचानक काढून घेणे दुर्देवाचे असल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणाले. सुरक्षा व्यवस्थेच्या अभावी या तिघांच्या जीवितास अपप्रवृत्तीच्या व्यक्ती किंवा राजकीय विरोधकांकडून धोका होण्याची शक्यता आहे. गणेश नाईक हे गेली १५ वर्षे मंत्री आणि पालकमंत्रीपदी होते. त्याकाळी त्यांना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेतले या निर्णयांमुळे अपप्रवृत्तीचे काही लोक दुखावले गेल्याची शक्यता असून धोका पोहोचविण्याचा संभव आहे. त्यामुळे या तिघांची सुरक्षा व्यवस्था कायम राहिली पाहिजे, असे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या तिघांची सुरक्षा व्यवस्था राजकीय हेतूने काढण्याची शक्यता देखील राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे. हे तिघे नवी मुंबईतील अत्यंत सभ्य, सुशील आणि सुसंस्कृत म्हणून ओळखले जातात. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईचा कायापालट झाला असून हे शहर ग्लोबल शहर म्हणून ओळखले जात आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी अहोरात्र झटणार्या या तीन व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था काढून घेतल्याने राजकीय सूडबुध्दीने काही कट कारस्थान होण्याचा अंदाज आहे. नवी मुुंबई क्षेत्रात यापूर्वी देखील घातपाताच्या घटना घडल्या आहेत. सुरक्षेच्या अभावी या व्यक्तींच्या जीविताला काही धोका झाल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. अशी परिस्थिती उदभवल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन आणि पर्यायाने राज्य शासनावर राहिल, असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे.
*** पोटनिवडणूक लागताच सुरक्षा काढली..
या प्रकरणी आपली प्रतिक्रीया देताना महापौर सुधाकर सोनावणे म्हणाले की, सुरक्षेप्रकरणी राजकारण करुन खच्चीकरण करण्याचे कारस्थान दिसून येते. प्रभाग ८८मधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका शशिकला मालादी यांच्या संशयास्पद मृत्यूचा अद्याप तपास लागलेला नाही. या प्रभागात पोटनिवडणुकीची प्रक्रीया सुरु झाली आहे. ही पोटनिवडणूक लागताच सुरक्षा काढल्याबददल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. जीवाशी खेळून राजकारण करु नका, टिका त्यांनी केली.
*** बैठक घेवून निर्णय**
सुरक्षा व्यवस्था पुन्हा प्रदान करण्याबाबत लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची बैठक घेवून निर्णय घेवू, अशी ग्वाही पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाला दिली आहे.