अमरावती : शहरातील अंबाविहार येथील एका घरामध्ये सुरू असलेल्या देहविक्रीविरोधात महिलांनी संताप व्यक्त केला आहे. संतप्त महिला आणि परिसरातील नागरिकांनी या घरात शिरून साहित्याची प्रचंड नासधूस करून घराला आग लावल्याची घटना घडली आहे.
अंबाविहार येथे राहणार्या एका महिलेच्या घरातून देहविक्रीचा व्यवसाय होत असल्याचा आरोप आहे. पोलिसांत तक्रारी दिल्या, परंतु छापामार कारवाईदरम्यान या घरात काहीच आढळून येत नसल्याचे पोलिसांनी म्हटले होते.
मात्र देहविक्री व्यवसायामुळे परिसरातील युवती आणि महिलांनादेखील येथे येणार्यांचा त्रास वाढत गेला आणि बुधवारी याचा उद्रेक झाला. या भागातील महिला मोठ्या संख्येने वाहनाने राजापेठ पोलिस ठाण्यात पोहोचल्या. ठाणेदार शिवा भगत यांच्यापुढे त्यांनी कैफियत मांडली. ठाणेदारांनी गस्त वाढविण्यासोबतच धाड टाकण्याचेदेखील आश्वासन दिले.
संबंधित महिलेचा गुंड प्रवृत्तीचा अल्पवयीन मुलगा परिसरात गोंधळ घालत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. परंतु आपण पोहोचून त्यांना वठणीवर आणू, असे आश्वासन देण्यात आले. पोलिस कारवाई करणार असल्याने या संतप्त महिला आणि नागरिकदेखील अंबाविहार येथील महिलेच्या घरासमोर पोहोचले. परंतु बराच वेळ होऊनही पोलिस न पोहोचल्याने अखेर संतप्त महिलांनी घराचा ताबा घेतला.
गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करण्यात आला. घराचे दोन्ही दारं तोडण्यात आले. घरातील साहित्याची प्रचंड प्रमाणात नासधूस करण्यात आली. टायर आणि रॉकेल टाकून घरातील गाद्या आणि अन्य साहित्य जाळण्यात आल्या. दरम्यान, देहविक्री व्यवसायाविरोधात पोलिस कारवाई करीत नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
जवळपास दोनशे महिला आणि पुरुष यावेळी या ठिकाणी जमले होते. घराची नासधूस आणि जाळपोळ केल्यानंतर जमाव परतला. तोडफोड आणि जाळपोळीनंतर जवळपास तासभराने राजापेठ पोलिस घटनास्थळी पोहोचले.