ख्रिईस्टचर्च : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील पाच लढतींच्या वनडे मालिकेला शनिवारपासून (२६ डिसेंबर) ख्रिईस्टचर्चमध्ये सुरुवात होत आहे. कसोटी मालिकेतील निर्भेळ यशानंतर वनडेतही सातत्य राखण्यास यजमान उत्सुक आहेत. याउलट कसोटीतील ०-२ मानहानीकारक पराभवानंतर पाहुण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
न्यूझीलंडने घरच्या मैदानावर प्रतिस्पर्ध्याना सहज धूळ चारली. केन विल्यमसन, मार्टिन गप्टिलचा जबरदस्त फॉर्म आणि टॉम लॅथम तसेच ब्रेंडन मॅककलमची त्यांना मिळालेली साथ पाहता यजमानांची फलंदाजी बहरली. फलंदाजांना गोलंदाजीची सुरेख साथ लाभली. वेगवान गोलंदाज टिम साऊदीने फॉर्म मिळवला आहे. त्याला नील वॅग्नरची चांगली साथ लाभली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने कर्णधार ब्रेंडन मॅककलमची मायदेशातील ही बहुधा शेवटची वनडे मालिका असेल. त्याला विजयी ‘निरोप’ देण्याचा प्रयत्न न्यूझीलंडचे क्रिकेटपटू करतील.
कसोटी मालिकेत ढेपाळलेल्या श्रीलंकेला क्रिकेटपटूंच्या दुखापतींनी ग्रासले आहे. वनडे मालिकेत त्यांना वेगवान गोलंदाज लसित मलिंगाविना खेळावे लागेल. न्यूझीलंड दौर्यात दुखापतीमुळे खेळू न शकलेला तो पाहुण्यांचा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. मलिंगापूर्वी धम्मिका प्रसाद आणि कुशल परेराला मायदेशात परतावे लागले. दुखापतीमुळे प्रसाद कसोटी मालिकेला मुकला. उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळल्याने कुशल परेराला संघातून काढून टाकण्यात आले. मलिंगा नसल्याने श्रीलंकेची गोलंदाजी कमकुवत झाली आहे. त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न यजमान संघ करेल.
वेळ : (शनिवारी) पहाटे ३.३० वा.