ठाणे : भातशेतीचे झालेले नुकसान व उन्हाळी भाजीपाला पिकही नुकसानकारक ठरल्याने शेतीमध्ये सतत नापिकी येवू लागली. या नापिकीला कंटाळून एका वयोरुद्ध आदिवासी शेतकर्याने राहत्या घरात विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना भिवंडी तालुक्यातील जांभिवली येथे घडली आहे.
बाळू गोविंद वड (वय-65) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. तो अल्पभूधारक शेतकरी असल्याने खरीपात कुटुंबाला पुरेल एवढे भातपीक त्याला शेतीमधून मिळत असे. मात्र यावर्षीच्या पावसाने पाठ फिरवल्याने भातपीक हातचे गेले तर रब्बीत त्याने भाजीपाला लागवड केली आहे. मात्र मेहनत आणि पिकावरच्या खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने शेती सतत नुकसानदायक ठरत होती.
त्यामुळे बाळू सतत चिंताग्रस्त असायचा या विवंचनेतून त्याने भाजीपाला पिकावर फवारणीसाठी आणलेले रोगर हे कीटकनाशक घेतले. सदरची घटना बाळू यांचे जावई व मुलीच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ उपचारासाठी भिवंडीच्या स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.