मुंबई – राज्य सरकारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून, आता महागाई भत्त्याचा दर ११३ टक्क्यांवरून ११९ टक्के एवढा झाला आहे.याबाबतचा शासन निर्णय आज काढण्यात आला आहे. १ जुलै, २०१५ पासून सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील (वेतनबँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ११३ टक्के वरून ११९ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ फेब्रुवारी, २०१६ पासून या महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात येणार आहे. १ जुलै, २०१५ ते ३१ जानेवारी २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीसाठी स्वतंत्रपणे आदेश काढण्यात येणार आहे. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे या पुढे लागू राहील. सदर आदेश सुधारित वेतनसंरचनेत वेतन अनुज्ञेय असलेल्या संस्थांमधील कर्मचार्यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील.