विशाखापट्टणम : भारतीय नौदलातील जगातली सर्वात जुनी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराटचं ५०० खोल्यांच्या हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. भारतीय नौदलानी ही युद्धनौका आंध्र प्रदेश सरकारच्या ताबा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशाखापट्टणमच्या किनार्याजवळच ह्या युद्धनौकेला कायमचं उभं करण्यावर विचार सुरू आहे. भारतीय नौदलात गेले २९ वर्षं कार्यरत असणार्या आयएनएस विराटचा आंध्र प्रदेश सरकार घेणार आहे, त्यानंतर आतमध्ये खोल्या बनवण्यात येतील. त्याचबरोबर या युद्धनौकेत रिसॉर्ट बनवण्याचाही विचार सुरू आहे.
दरम्यान,आयएनएस विक्रमादित्य ही नौदलात दाखल झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलनानंतर आयएनएस विराटची रवानगी कोची बंदरात करून तिला निवृत्त करण्याचा निर्णय नौदलाने घेतला आहे. भारतीय नौदलाच्या सेवेत एकूण २९ वर्ष राहिलेली आणि जगातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल ५७ वर्षे कार्यरत राहिलेली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट जून २०१६ च्या अखेरीस निवृत्त होत आहे. आयएनएस विराट ही ब्रिटनमध्ये तयार करण्यात आलीये. त्यानंतर भारतानं ती विकत घेतली. १२ मे १९८७ रोजी ती भारतीय नौदलात रीतसर दाखल झाली. आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विराट या दोन्ही युद्धनौकांनी भारतीय नौदलात आतिशय महत्वाची कामगिरी बजावली. पण १९९७ पासून आयएनएस विराट ही एकमेव विमानवाहू युद्धनौका भारताकडे उरली.
खरं तर आयएनएस विराटचे आयुष्यमानही कधीच संपत आलं होतं, मात्र तिची डागडुजी करून वारंवार तिचं आयुष्यमान वाढविण्यात आलं. आता मात्र यापुढे आयुष्यमान वाढवणं शक्य नसल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला. त्यानंतर संरक्षण मंत्र्यालयाने या युद्धनौकेची जबाबदारी घेण्यासाठी विविध राज्य सरकारशी संपर्क साधला. तसंच संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी ,आयएनएस विराटला १रुपयात राज्य सरकारला सुपूर्द करण्यात येईल असं आवाहनही केलं होतं. त्यानंतर आंध्र प्रदेशचे मुंख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आयएनएस विराटची जबाबदारी स्विकारण्याचा निर्णय घेतला.