दिल्ली : तब्बल सहा दिवस बर्फाखाली मृत्युशी झुंज देणार्या जवान लान्स नायक हणमनथापा कोप्पाड याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीतील आर आर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी, ‘संपूर्ण देश या जवानासाठी प्रार्थना करतोय, त्याच्या धाडसाचं शब्दांत वर्णन करणं शक्यच नाही’, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
सियाचीनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिमस्खलनात एक जेसीओ आणि ९ जवान बर्फाखाली गाडले गेले होते. या जवानांचे मृतदेह शोधण्यासाठी लष्करानं सुरू केलेल्या मोहिमेत आज एक जवान चक्क जिवंत सापडला आहे. लान्स नायक हणमनथापा कोप्पाड गेल्या ६ दिवसांनंतरही २५ फूट बर्फाखाली चक्क जिवंत सापडल्यानं सगळ्यांनाच सुखद धक्का बसला होता. हणमनथापा कोप्पाड यांना बर्फातून बाहेर काढल्यानंतर त्यांना प्रथम सियाचीन ग्लेशियर इथल्या लष्कराच्या बेस कॅम्पवर नेण्यात आलं. त्यानंतर एअर ऍम्ब्युलन्सने त्यांना दिल्लीतील आर आर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी हॉस्पिटलमध्ये जाऊन या जवानाच्या प्रकृतीची विचारपूस केली. हणमनथापा यांच्या तब्येतीसाठी अख्खा देश प्रार्थना करतोय, त्यांच्या प्रकृतीत नक्की सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.