मुंबई – महापालिकेतील सेवक किंवा अधिकार्याच्या विधवा पत्नीने पुनर्विवाह केल्यास तिला देण्यात येणारे निवृत्तिवेतन बंद करण्यात येत होते. मात्र, आता या नियमात मुंबई महापालिका बदल करणार असून विधवेने पुनर्विवाह केल्यास तिचा निवृत्तिवेतनावरील हक्क अबाधित राहणार आहे. त्यासाठी पालिकेने एक प्रस्ताव तयार केला असून बुधवारी होणार्या स्थायी समितीमध्ये तो मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.
राज्य शासनाने पुनर्विवाह करणार्या विधवांचा निवृत्तिवेतानवरील हक्क अबाधित ठेवण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेतला आहे. त्याला अनुसरून मुंबई महापालिकेतील नगरसेवक रामआशिष गुप्ता यांनी महापालिकेने याबाबत धोरणात बदल करावा, अशी ठरावाची सूचना दाखल केली होती. त्यास पालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
विधवांना पुनर्विवाहानंतरही कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या १८८८ च्या कलम ८१ मध्ये सुधारणा केली जाणार आहे. संबंधित कलमात सुधारणा करण्यासंबंधाचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केल्यास पालिकेतील सेवक आणि अधिकार्यांच्या विधवा पत्नींना त्याचा लाभ मिळणार आहे.
सरकारी सेवेत असताना कर्मचारी वा अधिकार्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीस फॅमिली पेन्शन मिळत होती. मात्र, तिने पुनर्विवाह केल्यानंतरही त्या महिलेस फॅमिली पेन्शनचा लाभ देण्याचा निर्णय राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये घेतला होता. सामाजिक जाणिवेतून राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाचा कित्ता आता मुंबई महापालिकेने गिरवण्याचा निर्णय घेऊन मोठे पुरोगामी पाऊल टाकले आहे.
त्याचे महापालिकेतील कर्मचार्यांनी स्वागत केले आहे.