आता कर्ज कसे फेडायचे ?
नवी मुंबई : सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी राज्यातील सत्ताधारी भाजपाने कंबर कसली असून सहकारी बॅंकापाठोपाठ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला आता भाजपाकडून ‘लक्ष्य’ करण्यात आले आहे. बाजार समिती नियमनातून कृषी माल वगळण्याच्या हालचाली भाजपा सरकारने सुरू केल्यापासून बाजार समिती आवारातील भाजी, फळ व कांदा बटाटा या कृषी मालाच्या तीन बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. कृषीमाल नियमनातून वगळल्या आता आम्ही कर्ज कसे फेडायचे? तुमच्या राजकीय वादात आमचा बळी कशासाठी? असा संतप्त सवाल बाजार आवारातील व्यापारी वर्गाकडून विचारला जात आहे.
ग्रामीण भागातून बाजार आवारात कृषीमाल आल्यावर व्यापारी त्या मालाची विक्री करतो व विक्रीमालाचे पैसे आपले कमिशन वजा करता शेतकऱ्याला पाठवितो. हा व्यहार वरकरणी सरळ वाटत असला तरी आपल्या गाळ्यावर शेतकऱ्याचा कृषी माल विक्रीला आणण्यासाठी व्यापाऱ्यांना लाखो रूपयांची गुंतवणूक शेतकऱ्याकडे करावी लागते. व्यापारी शेतकरी वर्गाला शेतात कृषीमाल पिकविण्यासाठी, खते-बियाणाकरता अगोदरच पैशाची आर्थिक मदत करत असतो. व्यापारी वर्ग शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत बिनव्याजी करत असतो, यामागे शेतकऱ्यांनी त्यांचा कृषीमाल आपल्या गाळ्यावर विक्रीकरता पाठवावा हाच त्याचा एकमेव हेतू असतो. व्यापारी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याकरता बाजारातून मात्र व्याजाने पैसे उचलत असतो. शेतकरी अनेकदा चार ते पाच व्यापाऱ्यांकडून पैसे उचलत असल्याचे प्रकारही मोठ्या संख्येने उजेडात आले आहेत.
भाजी, फळ व कांदा बटाटा मार्केटमधील व्यापारी अनधिकृत कृषी मालाच्या व्यापारामुळे व अवैध वाहतुकीमुळे आधीच त्रस्त झालेला आहे. राज्य शासनाने बाजार समिती आवारातील घटकांना अनधिकृत कृषी मालाचा व्यापार व कृषीमालाची अवैध वाहतुक याविरोधात मार्केट स्थंलातरीत झाल्यापासून काडीमात्र सहकार्य केलेले नाही. ग्रामीण भागातील शेतकरी शेतात माल पिकविणार कधी व मुंबईमध्ये येवून विकणार कधी हे लक्षात घेता त्यामुळे ही अशक्यप्राय संकल्पना असल्याचे बाजार आवारातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कृषीमाल नियमनातून उठविल्यास आजवर जे अनधिकृतपणे कृषीमालाचे व्यापार करत होते, कृषीमालाची अवैध वाहतुकन करत होते, त्याचाच यामुळे फायदा होणार आहे. आजवर ते आपला व्यवसाय चोरून करत होते, ते उजळ माथ्याने उघडपणे व्यवसाय करतील. पण यामुळे व्यापारी, माथाडी, मापाडी, वारणार, मेहता, पालावाल याशिवाय बाजार आवारातील अन्य घटक देशोधडीला लागतील ही वस्तूस्थिती बाजार आवारातील घटक भाजपा सरकारच्या निदर्शनास आपापल्या मार्गाने आणून देण्याचा प्रयास करत आहेत.
भाजपाला सहकार क्षेत्रात आपले कार्यक्षेत्र विस्तारायचे असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रभाव असलेल्या कार्यक्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंख छाटण्याचा प्रयास त्यांच्याकडून सुरू झाला आहे. मात्र या राजकीय वादात बाजार समितीचे अस्तित्वच संपुष्ठात येणार असून मार्केटमधील मराठी टक्का देशोधडीला लागण्याची शक्यता असल्याने शिवसेना व मनसेच्या सुप्रिमोंकडे हा प्रश्न नेण्याच्या हालचाली बाजार आवारातील मातब्बरांनी सुरू केल्या आहेत.