वाशी : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आपत्तींना सक्षमतेने सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल तत्पर असून अत्याधुनिक वाहने, साधनसामुग्री तसेच प्रशिक्षित अग्निशमन अधिकारी-कर्मचारी यांनी सज्ज आहे. यामध्ये अधिक भर घालत अग्निशमन दलाच्या वाहनांच्या ताफ्यात रेस्क्यु टेंडर या अत्याधुनिक वाहनाची भर पडत असून वंडर्स पार्क येथे झालेल्या झाडे, फुले, फळे, भाजीपाला प्रदर्शन प्रसंगी या वाहनाचा महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी महापौर महोदयांसमवेत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार मंदा म्हात्रे, ऐरोली विधानसभा सदस्य आमदार संदीप नाईक, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, सभागृहनेते जयवंत सुतार, आरोग्य समिती सभापती पुनम पाटील, क्रीडा समिती सभापती प्रकाश मोरे, नगरसेवक रविंद्र इथापे, डॉ. जयाजी नाथ, शशिकांत राऊत, उषा भोईर, सलुजा सुतार, उषा पाटील, शिल्पा कांबळी, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार, मुख्यालय उपआयुक्त जे.एन. सिन्नरकर, उद्यान उपआयुक्त सुभाष इंगळे, कार्यकारी अभियंता संजय देसाई व अरविंद शिंदे, उद्यान विभागाचे सहा.आयुक्त चंद्रकांत तायडे, सहा. आयुक्त दत्तात्रय नागरे, उप मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. विजय राणे, वाहन विभागाचे उप अभियंता श्री. सुधीर जांभवडेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
रस्त्यावर घडणारे अपघात तसेच विविध प्रकारच्या आपत्कालीन प्रसंगी सहाय्य व विमोचन करणे याकरीता रेस्क्यु टेंडर या अत्याधुनिक वाहनाचा उपयोग होणार असून यामध्ये आधुनिक प्रकारची सुरक्षा साधने व साहित्य उपलब्ध आहे. या वाहनात विदेशी बनावटीची शटर्स असून कटींग, लिफ्टींग, स्प्रेडींग गिअर्स, कॉंक्रिट कटर, कॉंक्रिट ब्रेकर, वूडन सॉ-कटर, रेस्क्यु बोट, लाईफ जॅकेट्स, विंच गिअर, टेलिस्कोपीक लॅम्प, केमिकल सूट, प्रॉक्झिमेरी सूट, डी-वॉटरींग पंप, फोर्सेबल एन्ट्रीगेट असे विविध प्रकारचे अत्याधुनिक व उपयुक्त साहित्य आणि सुविधा या वाहनात उपलब्ध आहेत. मे. हायटेक पुणे यांनी चार महिन्यांच्या कालावधीत या वाहनाची बांधणी केली असून रेस्क्यु टेंडर या अत्याधुनिक साधन सामुग्रीने युक्त वाहनामुळे नवी मुंबई अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणात मोलाची भर पडली आहे.