नवी मुंबई: नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गेल्या २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘दहशतवाद विरोधी सप्ताह’चा समारोप २७ फेब्रुवारी रोजी राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अप्पर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
वाशीतील ‘सिडको’च्या एक्झीबिशन सेंटरमध्ये झालेल्या सदर समारोप कार्यक्रम प्रसंगी ‘नवी मुंबई’चे पोलीस आयुक्त प्रभात रंजन, परिमंडळ-१चे पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप, मुख्यालय उपआयुक्त प्रशांत खैरे, विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज दायमा (तुर्भे), अरुण वालतुरे (वाशी), किरण पाटील यांच्यासह परिमंडळ-१ मधील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, इतर पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच शाळा-महाविद्यालतातील विद्यार्थी, शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी मुंबई पोलिसांनी राबविलेल्या ‘दहशतवाद विरोधी सप्ताह’चे अपर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांनी कौतुक केले. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याने नवी मुंबई पोलिसांनी राबविलेला ‘दहशतवाद विरोधी सप्ताह’चा कार्यक्रम लवकरच सर्व राज्यभर सुरु करण्याचे सूतोवाच विवेक फणसळकर यांनी यावेळी दिले. तर पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी ‘दहशतवाद विरोधी सप्ताह’ यशस्वी करण्यासाठी
विशेषत्वाने प्रयत्न केलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह शाळा-कॉलेज, विविध संस्था आणि नागरिकांचे भाषणातून अभिनंदन केले.
सदर कार्यक्रमप्रसंगी ‘दहशतवाद विरोधी सप्ताह’अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच सदर निवडक चित्र प्रदर्शित करुन बनविलेल्या कॅलेंडरचे आणि पोलिसांनी राबविलेल्या विविध उपक्रमांच्या स्मरणिकेचे प्रकाशन विवेक फणसळकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी झटलेल्या नागरिकांना देखील यावेळी सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, संपूर्ण जगामध्ये दहशतवाद्यांच्या कारवायात वाढ होत असून याच दहशतवाद्यांनी भारतातील प्रमुख शहरांना यापुर्वी लक्ष्य बनविले आहे. अतिरेक्यांकडून घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटासारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आहे. अशा घटनांमुळे जनतेमध्ये भितीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असल्यामुळे दहशतवाद्यांचा संभाव्य धोका ओळखून समाजामध्ये याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने परिमंडळ-१ च्या वतीने गत वर्षापासून ‘दहशतवाद विरोधी सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या सप्ताहात पोलिसांनी घरमालक-भाडेकरु नोंदणी, निबंधचित्रकला स्पर्धा, दहशतवाद-जागरुकता हाच उपाय यावर मार्गदर्शन, विद्यार्थी रॅली, सायबर टेररिझम, परिमंडळातील महत्वाच्या स्थळांच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी, बोगस सिमकार्ड धारकांची तपासणी, असुरक्षित वाय-फाय कनेक्शन, बॉम्ब सदृश्य वस्तुंचे-बॉम्ब शोधक-नाशक पथकाचे प्रदर्शन, क्युआरटी डेमो, पोलीस पथ संचलन, आपत्कालीन व्यवस्थापन, आदि विविध २३ कार्यक्रमांचे आयोजन केले होते, अशी माहिती पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप यांनी दिली. तर विद्यार्थी रॅलीमध्ये परिमंडळ अंतर्गत शाळांमधील एकूण २५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात सीबीडी येथील १२ हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सीबीडीत २७०० विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन बनविलेली तिरंग्याची प्रतिकृती तसेच स्टॉप टेररिझम असा संदेश या ‘दहशतवाद विरोधी सप्ताह’चे आकर्षण ठरल्याचे उमाप यांनी सांगितले.