मुंबई : मानखुर्द मधील एका स्थानिक गुंडांच्या जाचाला कंटाळून शनिवारी रात्री १२ वाजता नागरिकच रस्त्यावर उतरले. या नागरिकांनी मध्यरात्रीच दोन तास रास्तारोको केला. त्यामुळे घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नागरिकांच्या या पावित्र्यामुळे पोलीसच गुंडांसमोर हतबल झाल्याचे दिसून आले.
मानखुर्दमधील ट्रान्झीट कॅम्पमध्ये मणी नावाचा गुंड येथील राहिवाशांना त्रास देतो. शनिवारी रात्री या गुंडाने काही लोकांना घरात घुसून मारहाण केली, त्यांच्या सामानाची आणि वाहनांची तोडफोडही केली. त्याच्यावर या पूर्वीदेखील गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने येथील जनतेत त्याची भीती होती, अशी माहिती काही स्थानिकांनी दिली. मात्र, आज काही लोकांना मारहाण केल्याने येथील जनतेचा प्रक्षोभ उफाळून आला आणि येथील जनतेने या गुंडगिरीविरोधात घाटकोपर रस्त्यावर उतरुन मानखुर्द लिंकरोड काही तास अडवून धरला होता. या आरोपीला जोपर्यंत पोलीस अटक करीत नाहीत, तोपर्यंत हा रास्तारोको सुरू राहील, अशी मागणी या आंदोलकांची होती. अखेर पोलिसांची जादा कुमक मागवून हा रास्ता रात्री एक वाजता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.