बेकरीत आढळला बेकायदेशीर शस्त्रसाठा
ठाणे : भिवंडी शहरात गायत्रीनगर परिसरातील रॉयल बेकरीत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ च्या पथकाने छापा टाकून हत्यारांचा साठा हस्तगत केला. याप्रकरणी भिवंडी-निजामपूर महापालिकेचे उपमहापौर अहमद सिद्दीकी यांचा भाऊ मोहम्मद अश्फाक सिद्दीकी याला अटक केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
गायत्रीनगर भागात सकाळच्या सुमारास रॉयल बेकरीतील छाप्यातून १ गावठी बनावटीचे पिस्तूल, ४ काडतुसे, ४ तलवारी, पोलादी कुकरी, तीन चॉपर अशी २० हजार ८०० रुपयांची प्राणघातक शस्त्रसामग्री हस्तगत करण्यात आली. भिवंडीतील एक बेकरीचालक लोडेड पिस्तुलासह फिरत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सकाळी अश्फाक यांच्याकडे छापा टाकून झाडाझडतीमध्ये ही शस्त्रसामग्री हस्तगत केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अशा घटनांची स्थानिक पोलिसांना माहिती नसल्याबद्दल नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.