आमदार संदीप नाईक यांच्या तिव्र विरोधानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
ऐरोली नजिक ३२.७७ हेक्टरवर मुंबईचे डंम्पिंग ग्राउंड उभारण्यास ऐरोली मतदार संघाचे आमदार संदीप नाईक यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेत तिव्र विरोध केला. आमदार नाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐरोली जवळ डंम्पिंगसाठी परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले. आमदार नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबईकरांवरील डंम्पिंगच्या दुर्गंधीमुळे निर्माण होणारे संभाव्य मोठे संकट टळले आहे.
३ फेब्रुवारी २०१६ रोजी मुंबई महापालिकेच्या देवनार येथील डंम्पिंग ग्राउंडला भिषण आग लागली होती. आगीमुळे निर्माण झालेला विषारी धूर मुंबईप्रमाणेच नवी मुंबईत पामबीच रोड, वाशी आणि इतर भागातही पसरला होता. त्यामुळे येथील नागरिकांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराची लागण लागण्याची भिती निर्माण झाली होती. तसेच या धुरामुळे डोळे चुरचुरण्याची आणि नागरिकांच्या त्वचेला बाधा झाली होती. मुंबई पालिकेचे देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग येथील डंम्पिंगच्या दुर्गंधीचा त्रास मुंबईला १० टक्के तर नवी मुंबईला ९० टक्के होत असल्याचे आमदार नाईक यांनी लक्षवेधीवर बोलताना सांगितले. डिसेंबर २०१५मध्येच आ.नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पालिकेचे आयुक्त अजय मेहता, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तसेच पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव या सर्वांबरोबर पत्रव्यवहार करुन मुंबई पालिकेच्या तिन्ही डंम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येणार्या हजारो मेट्रीक टन कचर्याची विल्हेवाट तातडीने लावण्यासाठी आणि शास्त्रोक्त पध्दतीने योग्य प्रक्रीया करण्याची मागणी केली होती. या सर्व संबधीत यत्रणांनी कार्यवाही सुरु असल्याचे लेखी उत्तर आमदार नाईक यांना दिले होते. लक्षवेधीवर मुददेसूद बोलताना आमदार नाईक यांनी सांगितले की, देवनार येथील जागा अपुरी पडत असल्याने ऐरोली नजिक ३२.७७ हेक्टर जागेवर डंम्पिंगला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी पाणथळी जागा आहे तसेच पक्षी अभयारण्य देखील मंजुर झाले आहे. जर या ठिकाणी डंम्पिंगला परवानगी दिली तर पाणथळी जागेच अस्तित्वच धोक्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भविष्यातील पक्षी अभयारण्याला देखील त्याचा फटका बसणार आहे. एकीकडे अस्तित्वात असलेल्या मुुंबईच्या डंम्पिंग ग्राउंडवर शास्त्रीय प्रक्रीया केली नाही. मुंबईच्या या तिन्ही डंम्पिंग ग्राउंडचा ऐरोली विधानसभा मतदार क्षेत्रातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत असताना दुसरीकडे ऐरोली नजिकच नविन डंम्पिंग ग्राउंडला परवानगी दिली जाते, अशी टिका आ.नाईक यांनी केली आहे. आमदार नाईक यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी ऐरोली नजिक कोणत्याही परिस्थितीत डंम्पिंगला परवानगी देण्यात येणार नाही असे नमूद करुन शास्त्रोक्त पध्दतीने कचर्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश आपण मुंबई महापालिकेला दिले असल्याचे उत्तरात स्पष्ट केले. भविष्यात जर ऐरोली नजिक डंम्पिंग सुरु करण्याचा प्रयत्न झाला तर नवी मुंबईकरांच्या आरोग्य रक्षणासाठी रस्त्यावर उतरुन तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार नाईक यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिला आहे.