परभणी : आपल्याकडे असलेल्या एका भांड्यावर आकाशातून वीज पडली, ते भांडे नासा खरेदी करणार आहे, अशी बतावणी करुन दोन कोटींना लुबाडणार्या तोतया पत्रकाराला परभणीत अटक करण्यात आली आहे. हबीब अहमद अब्दुल्ला उर्फ हम्मु चाऊस असं या भामट्याचं नाव आहे.पुढील संशोधनासाठी आपल्याला २ कोटींची आवश्यकता आहे, असं सांगत हबीबने काही लोकांकडून २ कोटी १७ लाख रुपये उकळले. या व्यवहारातून १५ हजार कोटी रुपये मिळणार असल्याची थाप ठोकत आता पैसे देणार्यांना १५ हजार कोटींमधला अर्धा हिस्सा देण्याचा वायदाही त्याने केला.फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली. तक्रारीवरुन पोलिसांनी शनिवारी रात्री परभणीतल्या राधिका पॅलेस हॉटेलमधून आरोपी हबीबला अटक केली आहे. त्याच्यावर नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .आरोपीकडून इंडिया टीव्ही या वृत्तवाहिनीचे बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले आहे. याशिवाय त्याच्याकडे असलेल्या इनोव्हा गाडीवर इंडिया टीव्हीचा लोगो असल्याचंही उघड झालं आहे. विशेष म्हणजे या अगोदरही हबीब फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी होता.