मुंबई : घाटकोपरमधील एच.जे.जोशी हिंदू सभा रूग्णालयातील १०० कर्मचारी व परिचारिका ३ दिवसापासून संपावर गेल्याने रूग्णालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. पोलिस सुरक्षेमध्ये रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्णांना ओषधे देवून उपचार केले आहेत. संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी व परिचारिकांनी रूग्णांवर उपचार करण्यास विरोध केला. तथापि पोलिसांनी त्यांचा विरोध मोडीत काढत रूग्णांवर उपचार करण्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य केले.ट्रस्टद्वारे मुंबईत जी रूग्णालये चालविण्यात येतात, त्यातील घाटकोपरचे हिंदू सभा रूग्णालय नावाजलेले आहे. या रूग्णालयामध्ये अत्यल्प दरामध्ये रूग्णांवर उपचार करण्यात येतात. आज रूग्णालयात ६६ रूग्ण असून त्यापैकी २२ रूग्णावर आज शस्त्रक्रिया होणार होती. ७६ रूग्ण नव्याने दाखल होणार होते. दररोज किमान ५०० रूग्ण या रूग्णालयात उपचारासाठी या रूग्णालयात येत असतात. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रूग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.या रूग्णालयात शरद राव यांच्या मुंबई लेबर युनियनच्या युनिटची स्थापना करण्यात आली असून रूग्णालयातील २७५ कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत. गुरूवारी कामावर आल्यावर युनियनशी संलग्न असणाऱ्या १०० कर्मचारी आपल्या काही मागण्यांकरीता संपावर गेले आहेत. त्यामुळे रूग्णालयातील डायालेसिस सेंटर, ओपीडी, एक्सरे, प्रयोगशाळा पूर्णपणे बंद झाले आहेत. ऑपरेशन थिएटरच बंद झाल्याने आज होणारे २२ ऑपरेशन रद्द करण्यात आले आहेत. संपामुळे ७६ रूग्णांना रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले नाही.