ठाणे जिल्ह्यात ३ लाख ६५ हजार ४०० महिलांकडे वाहन परवाना
ठाणे : कधी काळी पुरुषांनी वाहन चालवायचे आणि महिलांनी पुरुषांच्या मागे त्यांच्या खांद्यावर घट्ट पकडून घाबरत बसायचे, असे चित्र सर्वत्र दिसत होते. मात्र, काळानुरुप स्त्रियांनी एकेक करत सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आपली उडान त्या स्वत:च घेत आहेत. ठाणे जिल्ह्यात तब्बल ३ लाख ६५ हजार ४०० महिलांकडे वाहनपरवाना आहे. त्यामुळे एकेकाळी गाडीवर पाठीमागे बसणारी स्त्री आज स्वत: ड्राईव्ह करत वाहनचालक बनली आहे.एकविसाव्या शतकातील आधुनिक महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. मग ते आकाशात विमान उडवण्याचे क्षेत्र असो की पृथ्वीवर रिक्षा चालवण्याचे क्षेत्र असो. ठाण्यासारख्या महानगरात वाहन चालवण्याचा परवाना घेण्याकडे महिलांचा मोठ्या प्रमाणावर कल दिसून येतो. सुमारे ३ लाख ६५ हजार ४०० इतक्या ठाणेकर महिलांकडे आज वाहन चालवण्याचा परवाना आहे. यापैकी ४८ हजार ७२० महिलांकडे व्यावसायिक वाहने चालवण्याचा परवाना आहे. तर गेल्या तीन वर्षात महिलांचा वाहन परवाना घेण्याच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.ठाण्यात ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ७ लाखांपेक्षा अधिक पुरुष वाहन चालकांना विविध वाहन चालवण्याचे परवाने देण्यात आले आहेत. तर वाहन चालवण्याच्या क्षेत्रात महिलाही मागे नाहीत. पुरुषांच्या तुलनेत ५० टक्क्याहून अधिक महिलांनी वाहन चालवण्याचे परवाने घेतले आहेत. ठाण्यात आजस्थित सुमारे ३ लाख ६५ हजार ४०० महिलांकडे वाहन चालवण्याचे परवाने आहेत. त्यात दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी वाहन चालवण्याच्या परवान्यांचा समावेश आहे. दुचाकी चालवण्याचे सर्वाधिक परवाने ठाणेकर महिलांनी घेतले आहेत. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत २ लाख १२ हजार ७८८ दुचाकी वाहन चालवण्याचे परवाने महिलांना देण्यात आले आहेत. तर त्यापाठोपाठ १ लाख ३६ हजार चारचाकी वाहने चालवण्याचे परवाने देण्यात आले आहेत. त्यात ३२ हजार ९८४ इतके परवाने व्यावसायिक वाहन चालवण्याचे आहेत. तसेच १५ हजार ७३६ तीनचाकी वाहन चालवण्याचे परवाने महिलांना देण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या तीन वर्षात वाहन चालवण्याचे परवाने घेणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने वाढली असून त्यात सरासरी ६० टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालवण्यात महिलांची पुरुषांशी बरोबरी केल्याची आकडेवारी दिसून आली आहे.