नवी मुंबई : पाणीबाणीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. २४ तास पाणीपुरवठा असणाऱ्या नवी मुंबईकरांना अवघ्या दोन तासाच्या पाणीपुरवठ्यावर समाधान मानावे लागत आहे. गुरूवारी सकाळीच जुईनगर सेक्टर २३ येथील सिध्दी टॉवर येथे पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेविका तनुजा मढवी यांनी तात्काळ केलेल्या उपाययोजनेमुळे अडीच तासात या समस्येचे निवारण झाले. तथापि या काळात हजारो लीटर पाणी गटारामध्ये वाहून गेले.सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास सिध्दी टॉवरजवळील जलवाहिनी फुटली. नुकतीच नव्याने बसविलेल्या जलवाहिनी जोडणीच्या ठिकाणीच फुटल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जाण्यास सुरूवात झाली. स्थानिक रहीवाशांनी तात्काळ नगरसेविका तनुजा मढवी यांना संपर्क साधून त्यांना या समस्येची कल्पना दिली. अवघ्या पाचच मिनिटामध्ये नगरसेविका तनुजा मढवी, श्रीधर मढवी,जयेश मढवी अवघ्या पाचच मिनिटामध्ये फुटलेल्या जलवाहिनीजवळ आले. पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याने नगरसेविका तनुजा मढवी यांनी मुख्य पाण्याच्या टाकीकडे धाव घेत पाणीपुरवठा बंद केला. मनपाचे कर्मचारी घेवून त्यांनी खोदकाम करवून घेतले असता जलवाहिनी जोडणीच्या ठिकाणीच फुटल्याचे निदर्शनास आले.जलवाहिनी जोडणीची रिंगच तुटल्याचे उघडकीस आले.जलवाहिनी फुटल्याचे समजताच नवी मुंबई मनपाच्या स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता शिंदे, तुर्भे विभाग कार्यालयाचे पाणीपुरवठा अधिकारी तुंगार आदी घटनास्थळी दाखल झाले.नगरसेविका तनुजा मढवी यांनी पाण्याची टाकीकडे जावून पाणीपुरवठा बंद करण्याची समयसूचकता दाखविल्याने पाण्याचा प्रवाह थांबला व पाणी वाचविता आले.