चायनीज चालकांच्या अतिक्रमणाचा उद्रेक
महापालिका प्रशासनाचा कानाडोळा
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ८ मधील अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्सच्या पहिल्या मजल्यावर विविध रूग्णालये कार्यरत असून तळाशी मात्र चायनीजच्या टपऱ्यांचे अतिक्रमण पहावयास मिळत आहे. रूग्ण व रूग्णाच्या नातेवाईकांना या अतिक्रमणातून वाटचाल करत उपचाराकरता ये-जा करावी लागते. महापालिका प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळे चायनीज चालकांचे व्यवसायाकरता मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्याचे धाडस वाढीला लागले आहे. महापालिका आयुक्तांनी पाहणी दौऱ्यामध्ये बकालपणा आणणाऱ्या या चायनीज टपरीचालकांचे अतिक्रमण हटविण्याचे अतिक्रमण उपायुक्तांना आणि नेरूळ विभाग अधिकाऱ्यांना आदेश देण्याच्या घटनेला चार महिन्याचा कालावधी उलटला आहे.चायनीजवाल्यांच्या अतिक्रमणाला आशिर्वाद देताना मनपा अतिक्रमण विभागाने व नेरूळ विभाग कार्यालयाने महापालिका आयुक्तांच्याच आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे पहावयास मिळत आहे.
नेरूळ सेक्टर आठमध्ये अंबिका शॉपिंग कॉंम्पलेक्स एकीकडे दर्जेदार आरोग्य सुविधेकरता प्रसिध्द तर दुसरीकडे चायनीजचालकांच्या टपऱ्यांच्या अतिक्रमणाकरता कुप्रसिध्द आहे. या कॉम्पलेक्समध्ये पहिल्या मजल्यावर कमलेश माता-बाल रूग्णालय, पंचकर्मचे ट्रू हेल्थ केअर सेंटर, प्रिया हॉस्पिटल, कल्याणी डोळ्यांचे हॉस्पिटल, ओम डॉयग्नोस्टिक सेंटर, शारदा नाक-कान-घसा हॉस्पिटल, महाजन डेंटल क्लिनिक, शिवम क्लिनिक, डॉ. डांगे डॉयग्नोस्टिक सेंटर असे विविध हॉस्पिटल्स कार्यरत आहेत. येथील आरोग्य सुविधेकरता नवी मुंबईतून रूग्ण या ठिकाणी येत असतात. विशेष म्हणजे या कॉम्पलेक्सच्या तळाला कल्पना व समाधान असे दोन बिअर बार असून विशेष म्हणजे कॉम्पलेक्सच्या पहिल्या मजल्यावर जाण्याकरता दोन्ही बिअर बाजूनेच जिना उपलब्ध आहे. रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांना बाराही महिने येथे जाण्याकरता मद्यपिंचा सामना करावा लागतो. या कॉम्पलेक्सच्या तळाशी लहान लहान टपऱ्या असून या टपऱ्यामध्ये चायनीजचा व्यवसाय केला जात आहे. रवी चायनीज, टेम्पटेंशन, रॉयल फूड्स या टपरीचालकांनी आपल्या टपरीच्या जागेलगतच्या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केलेले आहे. विशेष म्हणजे चायनीजचालकांनी सभोवतालच्या जागेवर अतिक्रमण करताना कॉम्पलेक्सच्या मोकळ्या जागेत दुपारी ४ नंतर आपल्या ग्राहकांना खुर्च्या टाकून येण्या-जाण्यास अडथळे निर्माण केले आहेत.
चायनीज चालकांनी केलेल्या अतिक्रमणाबाबत वैद्यकीय सुविधा देणाऱ्या डॉक्टरांनी, रूग्णालय व्यवस्थापणाने वारंवार नाराजी व्यक्त करूनही पालिका प्रशासन चायनीजचालकांच्या अतिक्रमणाला पाठिशी घालत आहे. या डॉक्टरांमध्ये माजी मुख्यमंत्र्यांच्या घरातील सदस्यांचा समावेश आहे. डोळ्याच्या विकारावर उपचार करणाऱ्यांमध्ये एक डॉक्टर तर मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांची पत्नीही आहे. माजी मुख्यमंत्र्यांची घरातील सदस्यांचे रूग्णालय व अतिरिक्त आयुक्तांच्या पत्नीचे डोळ्यांचे हॉस्पिटल असतानाही मनपा प्रशासनाचा अतिक्रमण विभाग व नेरूळ विभाग कार्यालय चायनीजवाल्यांना पाठिशी घालत असण्यामागे फार मोठे अर्थकारण दडले असल्याचा आरोप स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे.
आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली
महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रभाग ८७चा पाहणी दौरा १० डिसेंबर २०१५ रोजी आयोजित करताना स्थानिक शिवसेना नगरसेविका सुनिता रतन मांडवे व स्थानिक रहीवाशांकडून समस्यांची माहिती जाणून घेतली असता, नगरसेविका मांडवे आणि स्थानिक नागरिकांनी तसेच आरोग्य सुविधा देणाऱ्या घटकांनी चायनीज टपऱ्यांच्या अतिक्रमणाचा, बकालपणाचा, चायनीजच्या कचऱ्याचा प्राधान्याने त्रास होत असल्याची तक्रार करत चायनीजच्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची व चायनीजचालकांना मुळ जागेत व्यवसाय करण्यास लावण्याची मागणी केली होती. आयुक्तांनी स्वत: चायनिज टपरीवाल्यांचे अतिक्रमण पाहत अतिक्रमण विभाग व नेरूळ विभाग कार्यालयावर कडक ताशेरे ओढत तात्काळ हे अतिक्रमण हटविण्याचे संबंधितांना निर्देश दिले होते. तथापि आयुक्तांनी चायनीजवाल्यांचे अतिक्रमण हटविण्याचे आदेश देवून चार महिन्यानंतरही अतिक्रमण विभाग कारवाई करत नसल्याने नेरूळ विभाग कार्यालयाने व अतिक्रमण विभागाने या आदेशालाच केराची टोपली दाखविली असल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कॉम्पलेक्समध्ये नगरसेवकांचेच गाळे
अंबिका शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये तळाला नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचेच गाळे आहेत. कॉम्पलेक्सच्या कार्यकारीणीवरही नगरसेवकच आहेत. विद्यमान नगरसेविकेचीही या ठिकाणी टपरी आहे. चायनीजवाल्यांच्या परिसरातील बॅनरवरही कॉम्पलेक्सच्या कार्यकारीणीतील नगरसेवकाचे फोटो झळकत आहे. त्यामुळे या टपरीवाल्यांना गाळे असणाऱ्या नगरसेवकाचा आधार असल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे. चायनीझ टपरीचालकांच्या अतिक्रमणाला खतपाणी घालणाऱ्या व चायनीजवाल्यांच्या बॅनरवर झळकणाऱ्या नगरसेवकांवर पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे.