ठाण्यामध्ये तब्बल l8.5 टन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या अंमली पदार्थाची बाजारातील किंमत 2 हजार कोटी आहे. ठाणे पोलीस आणि ठाणे क्राईम ब्रांचच्या नार्कोटिक्स विभागाने केलेल्या कारवाईत हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. कारवाईत पाच जणांना अटकदेखील करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्याची ही पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे.
खब-याने दिलेल्या माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ठाणे क्राईम ब्रांचच्या 16 अधिका-यांचं पथक बनवण्यात आलं होतं. या पथकाने कारवाई करत हा छापा टाकला. अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींच्या चौकशीतून अजून महत्वाची माहिती मिळेल असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्यभरात छापे टाकून मोठी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.