नवी मुंबई : रायगड व ठाणे जिल्ह्यात मृदुंगाचार्य व गायनाचार्य या नावाने प्रसिध्द असणारे विश्वनाथ बुवा कान्हा पाटील यांचे शनिवारी अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ६१ वर्षे होते. नेरूळ गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ठाणे व रायगड जिल्ह्यातील त्यांचा विद्यार्थी वर्ग, नवी मुंबईतील ग्रामस्थ आणि नेरूळ-सारसोळे-कुकशेतचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही दिवसापूर्वी त्यांना वाशीतील एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सकाळी ७ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. रायगड व ठाणे जिल्ह्यात गुरूपौर्णिमा विश्वनाथबुवा पाटील यांचे विद्यार्थी मोठ्या उत्साहात साजरी करतात. त्यांच्या अंत्यविधीला ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक अनंत सुतार, नवी मुंबई मनपा सभागृह नेते जयवंत सुतार, विद्यार्थी समिती सभापती गिरीश म्हात्रे, नगरसेवक अमित मेंढकर, राष्ट्रवादीचे अशोक आतकरी, भाऊ मढवी, विरेंद्र लगाडे, मनोज मेहेर, तुकाराम टाव्हरे, देवनाथ म्हात्रे, महादेव पवार, मिलिंद पाटील यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी स्मशानभूमीत हजर होते.माजी खासदार संजीव नाईक, मनपा सभागृह नेते जयवंत सुतार यांनी यावेळी श्रध्दाजंली वाहिली. राखाडीचा कार्यक्रम सोमवारी (दि.१८ एप्रिल) होणार असल्याची माहिती विश्वनाथबुवाचे पुतणे व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांनी दिली.