मनसेचे दुष्काळग्रस्तांना आवाहन
मुंबई : न्यायालयीन दणक्यानंतर महाराष्ट्र सरकारने पावसाच्या तोंडावर २९ हजार ६०० गावांमध्ये दुष्काळ जाहिर केला आहे. दुष्काळाबाबत त्या त्या गावातील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना, नागरिकांना सरकारकडून मदत मिळण्यास विलंब होत असेल अथवा योग्य त्या सुविधा मिळत नसतील तर त्याची माहिती दुष्काळग्रस्त भागातील ग्रामस्थांनी ०२२-४३३३६९९ या क्रमाकांवर माहिती द्यावी, मनसे त्याचा पाठपुरावा करेल अशी माहिती मनसेकडून एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
दुष्काळ मोजण्याची पध्दती रूढ असतानाही शब्दांचे खेळ करत राज्य सरकारने महाराष्ट्रातील ७५ टक्के दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात जी दिरंगाई दाखविली आहे, त्यास महाराष्ट्रातील जनता त्यांना कदापि माफ करणार नसल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. दुष्काळाच्या नावावर केंद्र सरकारपुढे हात पसरताना भाजपाला लाजही वाटत नाही, मग योग्य वेळी दुष्काळ जाहिर करायला यांचे हात कोणी धरले होते का? भाजपा स्वत:ला ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणत असताना, मोठ्या प्रमाणावरील दुष्काळ पाहताना त्यांच्या संवेदना मेल्या होत्या का, असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे.
२००९ साली केंद्र सरकारने तयार केलेल्या ‘दुष्काळ व्यवस्थापन मार्गदर्शिकेची’ची कडक अंमलबजावणी राज्यात करण्याची मागणीही मनसेकडून करण्यात आली आहे. कृषी कर्ज, विद्यार्थ्याची फी माफ करणे, मागणीनुसार चारा छावण्या सुरू करणे, पीक कर्जाची वसुली थांबविणे,शेतकऱ्यांना वीजबिलाच्या वसूलीतून सुट देणे अशा अनेक गोष्टी सरकारला कराव्या लागतात. सरकार या गोष्टी करत नसेल तर दुष्काळग्रस्तांनी संपर्क करावा, मनसेकडून त्याकरता पाठपुरावा करण्यात येईल, असे मनसेकडून शेतकऱ्यांना कळविण्यात आले आहे.