सुट्टी पडूनही पार्कात शांतताच
नवी मुंबई : उन्हाळ्याची सुट्टी असतानाही नेरूळ (प.) येथील वंडर्स पार्कमध्ये शुकशुकाट पहावयास मिळत आहे. रविवार असतानाही सकाळच्या वेळी जेमतेम ४०-४२ तिकीटांचीच विक्री झाल्याचे पहावयास मिळाले. संध्याकाळच्या वेळीही जेमतेम सरासरी १८० ते २०० तिकीटांची विक्री होत आहे. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मुले गावी गेल्याचे कारण वंडर्स पार्कमधील कर्माचाऱ्यांकडून सांगण्यात येत असले तरी वंडर्स पार्कमध्ये जायचे म्हटल्यावर पाचशे ते हजार रूपये खर्च होत असल्याने सर्वसामान्य अल्प व मध्य उत्पन्न गटातील रहीवाशी अलीकडच्या काळात वंडर्स पार्ककडे पाठ फिरवू लागल्याचे पहावयास मिळत आहे.
नेरूळ पूर्वेकडे असणारे वंडर्स पार्क म्हणजे लहान मुलांसह त्यांच्या पालकांसाठी पर्वणीच आहे. लांबवर पसरलेले उद्यान व लहान मुलांसाठी खेळणी हे चित्र शहरामध्ये दुर्मिळ झाले आहे. सुरूवातीच्या काळात वंडर्स पार्कला प्रतिसाद चांगला मिळाला. पण अलीकडच्या काळात वंडर्स पार्कला भेट देणाऱ्यांचे प्रमाण घटत चालले आहे. सकाळी ६ ते १२ व दुपारी ३ ते ९ या वेळेमध्ये हे वंडर्स पार्क सर्वसामान्यांसाठी खुले असते. ० ते ५ वर्षे वयोगटापर्यत लहान बालकांना प्रवेश विनामूल्य असून ५ ते १२ वर्षापर्यतच्या मुलांकडून २५ रूपये तर १२ वर्षाच्या पुढे ३५ रूपये महापालिका प्रशासनाकडून आकारण्यात येत आहे. जगातील ७ आश्चर्याच्या प्रतिकृती या वंडर्स पार्कमध्ये आहे. लहान मुलांसाठी खेळणी असली तरी सांयकाळी चालविली जातात. नवी मुंबईतल्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये वंडर्स पार्कचा समावेश असतानाही नवी मुंबईकरांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे तिकिट विक्रीवरून पहावयास मिळते. वंडर्स पार्क हे नेरूळ आणि सिवूडस रेल्वे स्थानकापासून लांब असल्याने या ठिकाणी जाण्याकरता एकतर स्वत:चे वाहन अथवा रिक्षाशिवाय पर्याय नसतो. त्यातच काही महिन्यापूर्वी वंडर्स पार्कमध्ये सुरू झालेले उपहारगृहदेखील महागडे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एकतर वंडर्स पार्कमध्ये फिरून दमल्यावर घरी जावून स्वंयपाक करण्याची महिलांची तयारी नसल्याने परिवाराला रेल्वे स्टेशनलगतच्या हॉटेलमध्ये घेवून जावे लागते. वंडर्स पार्कला जायचे म्हटल्यास पार्क तिकिट, प्रवास खर्च, हॉटेल आदी जमेस धरता पाचशे ते हजार रूपये खर्च होत असल्याने अल्प व मध्य उत्पन्न गटातील वंडर्स पार्कच्या दिशेने फिरकतही नाहीत.